कारच्या काचा फोडून कोयत्याच्या धाकाने दुकानदाराला लुटले!

पिंपरी : थेरगाव येथील एका व्यापाऱ्याच्या कारच्या काचा फोडून नुकसान केले. आरोपींना अडवण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या गळ्याला कोयता लावून त्याच्याकडील दीड हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. ही घटना सोमवार 10 ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी वैभव आनंदराव नळगिरे (वय 27, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .नीरज हकीम सोळंके (वय 21, रा. थेरगाव), सुरज हकीम सोळंके (वय 19, रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी त्यांची आर्टिगा कार थेरगाव येथील आनंदा हॉस्पिटल जवळ पार्क केली होती. आरोपी तेथे आले आणि त्यांनी पेव्हर ब्लॉक, वीट आणि कोयत्याने मारून कारच्या काचा फोडल्या. फिर्यादी आरोपींना अडवण्यासाठी गेले असता नीरज यांनी हातातील कोयता त्याच्या गळ्याला लावून धमकी दिली. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या खिशात हात घालून दीड हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.

