मोशी कचरा दुर्घटना चौकशीसाठी एसआयटी स्थापन!

पिंपरी : मोशी कचरा डेपो मध्ये झालेल्या दुर्घटनेच्या तपासासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. एसआयटी मार्फत दुर्घटने मागील तांत्रिक कारणे, सुरक्षेच्या त्रुटी, जबाबदारी निश्चित करुन संबंधित सर्व घटकांची भूमिका याचा तपास केला जाणार आहे. एसआयटी कडून दुर्घटनेची सखोल आणि तांत्रिक पूर्ण माहिती घेतली जाणार आहे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होईल असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ 3) चे मारुती जगताप यांनी सांगितले.

मोशी कचरा डेपोत कचऱ्याचा डोंगर कोसळून आठ जुलै रोजी नऊ कामगारांचा नाहक बळी गेला आहे. महापालिकेने अनेक दिवस युद्ध पातळीवर बचाव कार्य करून कामगारांना जिवंत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही .एनडीआरएफ, भारतीय सैन्य, अग्निशामक दल यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले .या दुर्घटनेनंतर पोलिसांनी अँटनी लॉरा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास अधिक प्रभावी आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे .
तपासादरम्यान कचऱ्याचा ढिगारा कोसळण्यामागील तांत्रिक कारणे, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले किंवा नाही, संभाव्य धोका माहित असूनही आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत. महापालिका प्रशासन संबंधित कंपनी आणि इतर जबाबदार घटकांची भूमिका याची कसून चौकशी एसआयटी मार्फत केली जाणार आहे. आवश्यक कागदपत्रे, तज्ञांचे अहवाल घटनास्थळांशी संबंधित तांत्रिक माहिती आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. या तपासातून दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबी स्पष्ट होतील . यामुळे दोषीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करणे सोपस्कार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्य उच्चस्तरीय चौकशी समिती या दुर्घटने बाबत चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेली आहे .

