Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

14th September 2026
पिंपरी-चिंचवड

पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनाला गती द्या: आमदार महेश लांडगे

पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनाला गती द्या: आमदार महेश लांडगे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका अधिकाऱ्यांची बैठक
पिंपरी : पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण आणि प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने पूर्ण करून कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

viara vcc
viara vcc

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतुकीचा वेग वाढण्यासह औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.

बैठकीत प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच, भूसंपादन प्रक्रियेमधील अडचणी, संबंधित विभागांमधील समन्वय आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाची मुदत लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगर रचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, सहायक संचालक संदेश खडतरे, कनिष्ठ अभियंता संतोष जगदाळे, NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर गौतम, सर्व्हेअर प्रशांत माळी तसेच विशेष भूसंपादन अधिकारी उषा विश्वासराव आणि हर्षद घुले उपस्थित होते.

यावेळी आमदार महेश लांडगे यांनी, “पुणे-नाशिक महामार्ग आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर हा भोसरी मतदारसंघासह संपूर्ण पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रकल्पाला विलंब होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण कराव्यात,” असे निर्देश दिले.

दरम्यान, आगामी काळात या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात उपाय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, प्रशासनानेही प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हालचालींना वेग दिला आहे.

प्रकल्पाची तांत्रिक वैशिष्ट्य
नाशिक फाटा ते खेड (राजगुरूनगर) दरम्यान राष्ट्रीय महामार्ग-६० वर सुमारे ३० किलोमीटर लांबीचा आठ पदरी (8-Lane) एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे ७ हजार ८२७ कोटी रुपये असून, तो ‘बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर’ (BOT) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे भोसरी, मोशी, चाकण आणि औद्योगिक पट्ट्यातील वाहतुकीला अखंड आणि वेगवान मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच, विद्यमान महामार्गाचे चार ते सहा पदरी रुंदीकरण, दोन्ही बाजूंना सेवा रस्ते (Service Roads) आणि वाहतूक सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"