भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू!

पिंपरी : जुपिटर दुचाकीवरून घरी जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने धडक देऊन दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या दहा वर्षीय मुलीचा या धडकेत मृत्यू झाला. तर दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्या. सृष्टी रोहित कुमार रावत ( वय 10) या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार 17 जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भांबोली गावच्या हद्दीत, संत तुकाराम सर्कल, ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी सीमा सुदाम पराम (वय 24, रा. ठाकरवाडी, सावरदरी, दत्ता काकडे यांच्या भाड्याच्या खोलीत, ता. खेड ,मूळ पत्ता- मु. पो. रामगड, ता. देवरी, श्री गोंदिया) यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्यादीत दाखल केली आहे. विष्णू नरसिंगराव देशमुख (वय 52, रा. सारणी सांगवी, सांगवी, बीड )असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या जुपिटर स्कूटी दुचाकी क्रमांक एम (एच/ 14 जे झेड/ ८२३५) ही गाडी चालवत सोबत त्यांचे पाठीमागे शेजारी राहणारी सृष्टी रोहित कुमार रावत (वय 10) असे स्कुटी वरून घरी जात असताना तळेगाव एमआयडीसी दिशेने भरधाव येणारा ट्रक क्रमांक (एम एच 43/ बीजी/ 5845) वरील चालक याने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक चालविला आणि फिर्यादीचे स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक देऊन फिर्यादी यांना जखमी केले. तर दुचाकी स्कुटीच्या पाठीमागे बसलेल्या सृष्टी रोहित कुमार रावत हिच्या पाठीला, पोटात आणि डोक्यात गंभीर दुखापत झाली आणि तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खेतमाळीस हे तपास करत आहेत.

