पिंपरी चिंचवड महापालिकेची १ जुलैपासून विशेष मालमत्ता कर वसुली मोहीम!

थकबाकीदारांवर कठोर कारवाई
पिंपरी, दि. १७ जून २०२६:* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी १ जुलै २०२६ पासून मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना बिल वाटपासोबत जप्तीपूर्व नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कर भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये निवासी मालमत्तांचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करणे तसेच व्यावसायिक आणि बिगरनिवासी मालमत्तांवर जप्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे.

मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी १ जुलैपासून सर्व विभागीय कार्यालयांमध्ये विशेष वसुली पथके तयार करण्यात येणार असून, मोठ्या थकबाकीदारांकडून वसुलीवर विशेष भर दिला जाणार आहे. वारंवार आवाहन करूनही कर भरणा न करणाऱ्या निवासी मालमत्तांचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करणे, तसेच व्यावसायिक व बिगरनिवासी मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिकेने कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीपर्यंत प्रतीक्षा न करता त्वरित कराचा भरणा करून ३० जून २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या सवलतींचा लाभ घ्यावा. तसेच जप्ती आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाने केले आहे.
३५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांना दिली नोटीस
महापालिकेच्या हद्दीत एकूण ७ लाख ४४ हजार ६०३ मालमत्तांची नोंद असून, १७ जून २०२६ अखेरपर्यंत सुमारे ३७० कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. आतापर्यंत ३ लाख ३९ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. वसुली मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरातील थकबाकीदारांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला असून, ३५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस प्राप्त होऊनही कर न भरलेल्या मालमत्तांवर महापालिकेकडून कोणत्याही वेळी जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती कर संकलन व कर आकारणी विभागातून देण्यात आली आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मालमत्ता कराचे उत्पन्न अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी दिलेला कर हा विकासकामांसाठी थेट उपयोगात येतो. त्यामुळे मालमत्ताधारकांनी उपलब्ध सवलतींचा लाभ घेत ३० जून २०२६ पूर्वी कर भरणा करावा. कर भरण्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शहराच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. मुदत संपल्यानंतर थकीत करावरील वसुली आणि कायदेशीर कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल. – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

