जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान!

देहुगाव : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याला यंदा सात जुलै रोजी श्री क्षेत्र देहू गाव येथून भक्तीमय वातावरणात प्रारंभ होणार आहे. श्री क्षेत्र देहू देवस्थान संस्थांच्या वतीने या सोहळ्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पालखी सोहळ्याच्या दिवशी परंपरेनुसार सकाळी धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि कीर्तनाच्या मंगल वातावरणात पालखीचे प्रस्थान होणार असून हजारो वारकरी, भाविक आणि दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. देहू ते पंढरपूर हा पालखी सोहळा सुमारे तीन आठवड्यांचा असून मार्गातील विविध ठिकाणी विसावा आरती आणि मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पालखीचा पहिला मुक्काम देहू नंतर विविध पारंपारिक ठिकाणी होणार असून पुढे आकुर्डी ,श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर (नाना पेठ पुणे), हडपसर, लोणी काळभोर, यवत, वरवंड (उंडवडी), बारामती (शारदा विद्यालय), सनसर, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, पालखीतळ निरास्नान, अकलूज, बोरगाव, श्रीपुर पिराची कुरोली ,वाखरी आदी मार्गे पालखी शनिवार दिनांक 25 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे.
दरम्यान काही ठिकाणी गोल रिंगण ,पादुका पूजन तसेच कीर्तन, भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुण्यातील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे संपूर्ण दिवस पालखीचा मुक्काम राहणार असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित आहे .शेवटच्या टप्प्यात वाखरी मार्गे पालखी पंढरपुरात प्रवेश करणार असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनाने सोहळ्याची सांगता होईल. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख हभ प विक्रम सिंह महाराज मोरे हभप. लक्ष्मण महाराज मोरे, हभप. उमेश महाराज मोरे ,अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे ,दिलीप महाराज मोरे यांनी दिली. या सोहळ्यासाठी प्रशासन देवस्थान आणि स्थानिक ग्रामस्थांनी व्यापक तयारी केली असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाणी, वैद्यकीय सेवा, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे.

