मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना घराघरांत पोहोचविणार : निरंजन डावखरे

भारतीय जनता पार्टी, पश्चिम महाराष्ट्र ‘विभागीय आढावा बैठक
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या ‘पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकी’त १ लाख वृक्षारोपण,आणीबाणी आणि जागतिक योग दिनासह मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना घराघरांत पोहोचविण्याचा निर्धार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश निरंजन डावखरे यांनी केला.

भारतीय जनता पार्टी, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने आज दि. ३ जून २०२६ पिंपरी-चिंचवड,पुणे उत्तर आणि मावळ जिल्हा पदाधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वाची ‘विभागीय आढावा बैठक’ मोठ्या उत्साहात पार पडली. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचा विकास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आगामी संघटनात्मक कार्यक्रमांची रणनीती आखण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विभाग समन्वयक आ. निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष व विभाग सहसंयोजक मा. विक्रम पावसकर, विभाग सहसंयोजक विक्रम देशमुख, अभियान प्रदेश सहसंयोजक विक्रम पाचपुते आणि जिल्हा प्रभारी भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. बैठकीचे स्वागताध्यक्ष भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष . शत्रुघ्न (बापू) काटे आणि पुणे उत्तर (मावळ) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी भूषवले.
राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यात ‘मोदी सरकारची यशस्वी वर्षे: विश्वास, विकास आणि जनकल्याण’ या महाअभियानाचे आयोजन केले जात आहे. या अंतर्गत प्रदेश नेतृत्वाकडून पिंपरी-चिंचवड जिल्ह्यासाठी ४ महत्त्वाचे कार्यक्रम देण्यात आले असून, त्यांचे प्रभाग आणि मंडल पातळीवर मायक्रो-प्लॅनिंग पूर्ण झाल्याची माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दिली.
बैठकीत प्रामुख्याने खालील ४ अभियानांच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा
१. पर्यावरण दिनी ऐतिहासिक पाऊल – १ लाख वृक्ष लागवड: येत्या ५ जून रोजी ‘पर्यावरण दिना’चे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी किमान १५,००० झाडे लावण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. तसेच, केवळ सोपस्कार न करता संपूर्ण सप्ताहात शहरात एकूण १ लाखाहून अधिक झाडे लावून त्यांचे यशस्वी जतन व संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
२. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन: २१ जून रोजी येणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे नियोजन संपूर्ण शहरात अत्यंत पद्धतशीरपणे करण्यात आले आहे. शहरातील विविध नामांकित योग संस्था, पतंजली परिवार आणि योगप्रेमींना सोबत घेऊन नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात योग दिन साजरा केला जाईल.
३. आणीबाणीचे ५१ वे वर्ष – मिसाबंदींचा सत्कार: २५ जून रोजी लोकशाहीचा काळा दिवस असलेल्या आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त मंडल स्तरावर ६ विशेष समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सर्व मंडलांमध्ये आणीबाणीच्या दाहकतेवर व्याख्यानांचे आयोजन करून, त्या काळात तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ ‘मिसाबंदी’ कार्यकर्त्यांचा जाहीर सत्कार व गौरव केला जाणार आहे.
४. मोदी सरकारच्या योजनांचे प्रदर्शन व जनजागृती: केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी विविध मंडलांमध्ये भव्य प्रदर्शनी (Exhibition) लावण्यात येणार आहे. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि सामान्य जनतेला मिळालेल्या लाभांच्या थेट प्रतिक्रियांचे व्हिडिओ बनवून ते लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.
पक्ष संघटनेचा सर्वात महत्त्वाचा कणा असलेल्या SIR नोंदणी अभियानाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये या नोंदणीचे काम अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या कामगिरीचा अहवाल सादर करताना सांगितले की, “पिंपरी- चिंचवड भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आपण आतापर्यंत जवळपास ४०% नोंदणी पूर्ण केली आहे. येत्या पुढील १५ दिवसांमध्ये हा आकडा ५०% च्या पार जाईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पक्ष संघटनेने दिलेली प्रत्येक जबाबदारी पिंपरी-चिंचवड जिल्हा १००% यशस्वी करून दाखवेल.”
बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि भाजप प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे यांनी पिंपरी- चिंचवडच्या गतिमान कामकाजाबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले आणि म्हणाले की, “पक्षाचा कोणताही राष्ट्रीय किंवा प्रांतीय उपक्रम असो, सर्व सरकारी योजना आणि संघटनात्मक कार्यक्रम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात पिंपरी-चिंचवड शहर नेहमीच संपूर्ण राज्यात अग्रेसर राहिले आहे. आज शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी सादर केलेले आगामी उपक्रमांचे नियोजन आणि ‘SIR’ नोंदणीचा प्रगती अहवाल पाहता, पिंपरी-चिंचवडने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान सिद्ध केले आहे.”
विभागीय आढावा बैठकीला आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरशेठ जगताप, मा. खासदार अमरजी साबळे, मा.खासदार रणजीत सिंह निंबाळकर,मा.आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्षश्री अभिषेक बारणे, मा.अध्यक्ष सदाशिवराव खाडे,सरचिटणीस सौ.वैशालीताई खाडये, सरचिटणीस विकास डोळस,पश्चिम महाराष्ट्र आणि मावळ परिसरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांचे जिल्हा संयोजक, सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि भाजपचे सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढावा बैठकीचे सूत्रसंचालन श्री योगेशजी बाचलं यांनी केले तर भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री श्री मधुकर बच्चे यांनी आभार मानले .

