मे महिन्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून 6 कोटी 76 लाख रुपयांचा दंड वसूल!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. वाहतूक पोलिसांनी मे महिन्यात वाहन चालकाविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत एकूण 62 हजार 727 वाहन चालकांवर कारवाई करून 6 कोटी 76 लाख 30 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त, वाहतूक विक्रांत देशमुख यांनी दिली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे असून देहू व आळंदी अशी संतांची भूमी आहे. पिंपरी येथे सर्वात मोठी बाजारपेठ आहे .याशिवाय आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून पाच महत्त्वाचे महामार्ग जातात. शहरात राज्यातील आणि देशातील नागरिक हे उदरनिर्वाह करिता औद्योगिक आणि आयटी पार्क क्षेत्रात स्थायीक झाले आहेत. शहराचा वाढता विकास आणि दळणवळणाकरिता दुचाकी, चार चाकी वाहनांचा वापर होत असल्याने वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे वाहनांशी निगडित अपराधांमध्ये, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात वाढ झालेली आहे. वाहन चालकांना वाहतुकीचे नियम मोडण्यास वेळीस प्रतिबंध करण्याकरता पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून दैनंदिनरित्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत असते.
मे 2026 या महिन्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये नंबर प्लेट 5475, धोकादायक ड्रायव्हिंग 284, मोबाईल वरून बोलने 1993, सिग्नल तोडणे 8483, ट्रिपल सीट 6539, ड्रंक अँड ड्राईव्ह 402, जड अवजड वाहन कारवाई 8142, काळी काच 3090, मॉडिफाइड सायलेन्सर 1032, रॉंग साईड 239, बसेस कारवाई 3490, रिक्षा कारवाई 3102, विनापरवाना 870, टोइंग कारवाई 11580, वाहतुकीस अडथळे अडथळा- नो पार्किंग 19340, लायसन निलंबन 166, हेल्मेट कारवाई 429 याप्रमाणे एकूण 62 हजार 727 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून सहा कोटी 76 लाख 30 हजार 900 रुपयांची वसुली करण्यात आली.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून होणारी दंडात्मक तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी असे आवाहन पोलीस उपायुक्त, वाहतूक विक्रांत देशमुख यांनी केले आहे .

