बचत गटातील महिलांकडून ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कर संकलन मोहीम सुरू असून, शहरातील मालमत्ताधारकांना महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात येत आहे.

निवासी, बिगर निवासी, औद्योगिक तसेच इतर मालमत्ताधारकांना प्रत्यक्ष भेट देत बचत गटातील महिलांकडून आतापर्यंत ५ लाख ९ हजार ७४७ इतक्या मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने नागरिकांना वेळेत मालमत्ता कर भरून विविध सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असल्याने नागरिकांनी या सुविधेचा त्वरित लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
१ एप्रिल २०२६ ते १२ मे २०२६ या कालावधीत महिला बचत गटांकडून एकूण ५ लाख ९ हजार ७४७ मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या ७ लाख ६६ हजार ३८५ मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी आतापर्यंत १ लाख ५३ हजार ९०२ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. यामधून महापालिकेला १४८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

