पुस्तक ज्ञानाने मानवी संस्कृती राहते जिवंत: डॉ. श्रीपाल सबनीस!

‘मधुगंधित हेमाक्षरे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
पिंपरी : “‘पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक असून त्यातूनच मानवी संस्कृती जिवंत राहते!’ असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित पुस्तकपूजन आणि कवयित्री हेमांगी बोंडे लिखित ‘मधुगंधित हेमाक्षरे : कवितांची मांदियाळी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ‘सरवा’कार प्रा. किसन वराडे तसेच प्रा. संजय पवार यांच्या विशेष उपस्थितीत, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले . प्रा. किसन वराडे, प्रा. संजय पवार, शाखा उपाध्यक्षा प्रा. डॉ. रजनी शेठ, कवयित्री हेमांगी बोंडे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘आज जगाचा नकाशा युद्धाने काळवंडला आहे. या पार्श्वभूमीवर स्थल कालाच्या सीमा ओलांडून पुस्तकातून मिळणारे ज्ञान जगातील माणुसकी आणि मानवी संस्कृती वाचवू शकते. ‘मधुगंधित हेमाक्षरे’ या शीर्षकावरून कवयित्री हेमांगी बोंडे यांचा आत्मविश्वास प्रतीत होतो; तसेच अनुभव आणि आयुष्याची पुण्याई सर्व प्रकारच्या कवितांसाठी पणाला लावून त्यांनी पूर्वसुरींशी आपल्या काव्याचे नाते जोडले आहे!’ राजन लाखे यांनी, ‘प्रज्ञा, प्रतिभा, प्रगल्भता अन् भाष्य यांचा समन्वय म्हणजे लेखनप्रक्रिया होय आणि या प्रक्रियेचा प्रत्यय ‘मधुगंधित हेमाक्षरे’ या काव्यसंग्रहातून येतो. प्रा. किसन वराडे, प्रा. संजय पवार यांनी मत व्यक्त केले.
कवयित्री हेमांगी बोंडे यांनी आपल्या मनोगतातून, ‘अध्यापनाच्या सेवेत असताना शैक्षणिक लेख, सामाजिक नाटक यासारखे तुरळक लेखन हे सेवानिवृत्तीनंतर करोना काळात ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’ या समूहातून शिकलेले कवितांचे विविध प्रकार या काव्यसंग्रहात आहेत. प्रार्थना, आरतीपासून भारुड, लावणी यासारखे पारंपरिक प्रकार, विडंबन, व्याकरणातील अलंकार वापरून कविता, विविध गीतप्रकार, रसप्रधान रचना, मुक्तच्छंद, ओवी, अभंग, चाराक्षरी ते चौदाक्षरी अशा अक्षरछंद रचना, वृत्तबद्ध कविता, गझल, हझल, हायकू, दोहा, मायबोली लेवा गणबोलीतील कविता अशा अनेक प्रकारांच्या कवितांची मांदियाळी ‘मधुगंधित हेमाक्षरे’ या माझ्या पहिल्याच संग्रहात समाविष्ट केली आहे.
विनिता श्रीखंडे, नीलिमा फाटक, कमल सोनजे, जयश्री श्रीखंडे, इला पवार, गीता सुतार, अनघा पाठक यांनी संयोजनात सहकार्य केले. किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक बोंडे यांनी आभार मानले.

