फक्त मुद्द्याचं!

9th March 2026
पुणे

वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा; पायाभूत सुविधांच्या बळावर विकासाला गती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा; पायाभूत सुविधांच्या बळावर विकासाला गती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत
पुणे, : पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी उपस्थित होते.

पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मोठ्या वाढीनंतर आता पुणे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’चे (जीसीसी) महत्त्वाचे केंद्र बनत आहे. गेल्या वर्षभरात देशातील सर्वाधिक जीसीसी स्पेस पुण्यात विकसित झाली असून त्यामुळे शहराचे आर्थिक व औद्योगिक महत्त्व आणखी वाढले आहे. या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुण्यात वाहतुकीसाठी जमिनीवर, आकाशात आणि जमिनीखाली अशा तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पुणे व परिसरासाठी दोन चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारले जात असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) आणि इतर सेवांना बळ दिले जात असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

विद्यापीठासमोरील या उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत व्यक्त झालेल्या भावना मान्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. विद्यापीठ मुख्यद्वारा समोर व गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

या उड्डाणपुलाची रचना एकात्मिक स्वरूपाची असून वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग आणि खालच्या स्तरावर रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. औंध व बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रॅम्प, शिवाजीनगरकडून बाणेर व पाषाणकडे जाण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूल, सेनापती बापट रोडशी जोडणी तसेच अंडरपास यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा करून पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्यात अजित पवार यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर तसेच नाशिक फाटा-खेड-राजगुरुनगर या महत्त्वाच्या मार्गांच्या विकासाला त्यामुळे गती मिळाली आहे.

, पुणे जिल्ह्यासाठी मेट्रोच्या पुढील टप्प्यांना मंजुरी, रामवाडी–वाघोली मेट्रो, येरवडा–कात्रज भुयारी मार्ग, हिंजवडी–शिवाजीनगर मार्गाचा डीपीआर तसेच विविध मार्गांचे सहापदरीकरण अशा अनेक विकासकामांमुळे पुण्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. पुणे शहराला मुंबई महानगराच्या धर्तीवर ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली असून ती प्रत्येक पुणेकरासाठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनींना श्रीमती पवार यांनी शुभेच्छाही दिल्या.

मोहोळ म्हणाले, पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे २७७ कोटी रुपये खर्च करून १ हजार ७६३ मीटर लांबीचा हा उड्डाणपूल उभारण्यात आला असून शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास त्याचा मोठा फायदा होईल.
श्रीमती मिसाळ म्हणाल्या,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच मांडलेल्या राज्याच्या अर्थ संकल्पात पायाभूत सुविधांवर जोर दिला असून त्यात पुण्यासाठी मोठ्या तरतुदी केल्या जेणे करून पुण्याला ग्रोथ हब करण्यासाठी मदत होईल. पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी केंद्र सरकारकडून ८० हजार कोटी रुपये मिळाले असून त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्याचा चौफेर विकास होणार आहे. श्रीमती नागपुरे यांनी पुणे महानगराच्या विकासासाठी हा पूल महत्वाचा ठरणार असल्याचे सांगितले.

डॉ. म्हसे यांनी प्रास्ताविकात या आत्याधुनिक पुलाच्या अभियांत्रिकी बाबी सांगून हा पूल पुणे महानगराच्या पश्चिम विभागासाठी महत्वाचा ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी आमदार सुनील टिंगरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, मुख्य अभियंता रियाज पठाण तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

या एकात्मिक दुमजली उड्डाणपूला बद्दल
उड्डाणपुलाची एकूण लांबी (रॅम्पसह) १७६३.५२ मीटर आहे. प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता किंमत ₹२७७ कोटी आहे.
औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या प्रमुख मार्गांना जोडणारी रॅम्प व वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ५५ मीटर लांबीचा स्टील गर्डर बसविण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"