वेगवेगळ्या ठिकाणी दोन तडीपार गुंडांना अटक!

पिंपरी : तडीपार आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा पिंपरी चिंचवड हद्दीत प्रवेश केलेल्या दापोडी आणि भोसरी एमआयडीसी येथील दोन तडीपार गुंडांना अटक करण्यात आली. त्यांनी घातक शस्त्र प्रतिबंधक आदेशाचे देखील उल्लंघन केले आहे.

गणेश उर्फ सुंदरी गण्या विष्णू आडागळे (वय 27, रा. वार्ड नंबर तीन, बापू काटे चाळ, दापोडी) यास पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी 25 एप्रिल 2026 मध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण व पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. त्या आदेशाचा भंग करून अडागळे हा 17 जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत, जय भीमनगर, दापोडी येथे पोलिसांना मिळून आला. त्याने घातक शस्त्र जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना कोयताजवळ बाळगला होता. संज्योत सुधाकर ओहोळ पोलीस शिपाई दापोडी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. दापोडी पोलीस तडीपार गुन्हेगाराचा तपास करत आहेत
बालाजी नंदू शिंदे (वय 20, रा. बालाजी नगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) या तडीपार गुंडास एमआयडीसी भोसरी पोलिसांनी पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये ताब्यात घेतले. या आरोपीला देखील दोन वर्षासाठी पुणे शहर, पुणे ग्रामीण, आणि पिंपरी चिंचवड मधून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी केली होती. बुधवार 17 जून रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पीसीएनडीटीए सर्कल कडून इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कृष्णा हेरिटेज सोसायटी गेट जवळील टपरी जवळ, सेक्टर नंबर दोन, इंद्रायणी नगर भोसरी) येथे या गुन्हेगारास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक लोखंडी तलवार मिळून आली. भोसरी पोलीस तडीपार गुन्हेगाराचा तपास करत आहेत.

