पुणे जिल्हा भविष्यातील ‘ग्रोथ हब’ : आमदार शंकर जगताप

राज्याचा अर्थसंकल्प विकासाचा सर्वसमावेशक ‘रोडमॅप’; ५ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा
पिंपरी : आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ आर्थिक घोषणांचा दस्तऐवज नसून, तो विकसित महाराष्ट्राचा एक व्यापक आराखडा आहे. शाश्वत, सर्व समावेशक, प्रगतशील आणि सुशासन असा विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसत आहे. ज्यामध्ये महापुरुषांचा आदर्श जतन करून विकसित महाराष्ट्राचा रोड मॅप तयार करण्याचा दूरदृष्टीकोन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडला आहे. मुंबई महानगराच्या धर्तीवर आता पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरे ‘ग्रोथ हब’ म्हणून नावारूपास येणार आहेत. यामुळे पुणे जिल्ह्याला जागतिक पातळीवर एक नवी आणि आधुनिक ओळख प्राप्त होईल,” असा विश्वास चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र आज थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) देशात अव्वल स्थानावर असून ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ मध्येही राज्याने सुवर्णपदक पटकावले आहे. पुणे हे आधीच उद्योगांचे केंद्र आहे, मात्र आता ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) सारख्या अत्याधुनिक क्षेत्रात पुण्याला जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न या अर्थसंकल्पातून साकार होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक समूह उभारण्याचा संकल्प राज्याच्या औद्योगिक भरभराटीला नवी दिशा देणारा ठरेल.’इन्वेस्ट महाराष्ट्र’ नावाचे एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले जात आहे, आणि प्रत्येक जिल्ह्यात लघु आणि मध्यम उद्योग केंद्र स्थापन केली जातील. या धोरणामुळे सुमारे ५ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
“शेतकरी आणि वारकरी संप्रदायासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आमदार जगताप म्हणाले, “बळीराजाला आधार देण्यासाठी सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी असलेल्या देहू येथील विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा घेतलेला संकल्प हा वारकरी संप्रदायाचा सन्मान करणारा आहे. जलयुक्त शिवार आणि वैरण विकासावर दिलेला भर कृषी क्षेत्राला नवा आयाम देईल. हा अर्थसंकल्प ‘सर्वसमावेशक विकास’ साधणारा असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी नमूद केले.

