ट्रकची तरुणाच्या दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू!

पिंपरी: भरधाव वेगाने ट्रक चालवून एका तरुणाच्या दुचाकीला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती रोड येथे शुक्रवार 30 जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत एका महिलेने (वय 32) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
लहू भगवान गोयकर (वय 27 ,गट नंबर 1252, तुळजाई नगर नेवाळे वस्ती, चिखली, रुपीनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने ट्रक क्रमांक एम एच/ 12/ एचडी /56 16 भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या मुलगा हिसानुर (वय 19 ) दुचाकी एक्टिवा (क्रमांक एम. एच. 12/ एन झेड/ 0 524) ला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याच्या हाताला, खांद्यावर तसेच डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कारंडे पुढील तपास करत आहेत.

अमली पदार्थाची विक्री ;एकास अटक!
पिंपरी : अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रुचून अटक केली असून त्याच्याकडून एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवार 29 जानेवारी रोजी जगताप डेअरी जवळील वाकड फाटा बस स्टॉप येथे करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई बंडू गिरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एलिया उर्फ बॉक्सर प्रवीण कांबळे (वय 21, रा. पिंपळे गुरव) याला अटक केली आहे .आरोपी हा बेकायदेशीर रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ बाळगून होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 39 हजार 600 रुपये किमतीची 7.92 ग्रॅम एमडी पावडर, प्लास्टिक पिशव्या, एक मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख 89 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

