लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे दूरदृष्टीपूर्ण विकासकार्य स्मरणात राहील : मुख्यमंत्री फडणवीस

कार्यकर्त्यांना प्रेरणा, ऊर्जा देणारे ”शक्तीस्थळ’ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थतित लोकार्पित
पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या माध्यमातून शहरात झालेल्या चिरस्थायी कार्याची आठवण देणारे, कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या शक्तीस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. हे शक्तीस्थळ कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे ठरेल असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गुरुवारी (दि 1) म्हणाले. औद्योगिकीकरणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या या शहराला अत्याधुनिकतेकडे नेण्यासाठी लक्ष्मणभाऊंनी राज्य सरकार आणि महापालिकेचा समन्वय साधत विकासाचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन प्रत्यक्षात उतरवले. त्यांची कारकीर्द, विकासातील योगदान कायम स्मरणात राहील असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याचा आढावा देणारा आणि कार्यकर्त्यांच्या ऊर्जेचे केंद्र ठरणाऱ्या शक्तीस्थळाचे लोकार्पण पिंपळेगुरव येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेश लांडगे, बापूसाहेब पठारे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार अश्विनी जगताप, चंद्रकांत मोकाटे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार विलास लांडे, उद्योजक उमेश चांदगुडे, माजी नगरसेवक आप्पासाहेब रेणुसे, ऐश्वर्या रेणुसे, चंद्ररंग डेव्हलपर्सचे विजय जगताप तसेच जगताप कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी आमदार शंकर जगताप यांनी लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्याचा जीवनपट उलगडला.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यावेळी म्हणाले,आम्ही कायम जगताप कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. यापुढील काळात लक्ष्मणभाऊंनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या स्वप्नातील शहर आज पूर्णत्वाला आणले जात आहे. त्यांच्या स्वप्नातील शहराचा विकास आराखडा आपल्याला अस्तित्वात आणायचा आहे. हे शक्ती स्थळ त्यांच्या प्रेरणेची ऊर्जा देणारे केंद्र ठरेल.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याकडे आध्यात्मिक बैठक होती. वारकरी संप्रदायाशी त्यांचे घट्ट नाते होते. मातीशी जोडलेली नाळ त्यांनी कधीच सोडली नाही. त्यामुळेच खऱ्या अर्थाने सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती. उत्तम खेळाडू, सांघिक नेतृत्व या माध्यमातून त्यांचे काम होते. ते उत्तम घोडेस्वार होते. त्यामुळेच विकासाचा वेग त्यांनी कायम राखला. असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

