तीन दिवसांनी सापडला नराधम

ड्रोन आणि डॉगस्क्वाडच्या मदतीने सापडला कॅनॉलच्या खड्ड्यात लपला होता आरोपी
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
शिरूर, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना पुण्यातील स्वारगेट स्थानकात तीन दिवसांपूर्वी पहाटे घडली होती. पुण्यात नोकरी करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट आगारातील नादुरुस्त एसटी बसमध्ये बलात्कार करणारा नराधम तीन दिवसांपासून फरार होता. अखेर शिरूर येथून पुणे पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या. दत्तात्रय गाडे असे त्या नाराधमाचे नाव आहे.
स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे स्वारगेट येथील बस स्थानकामध्ये फलटणला जाणाऱ्या सव्वीस वर्षे तरुणीवर बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर २४ तास ही घटना माध्यमांना समजू नये, यासाठी पोलिसांनी काळजी घेतली मात्र सोशल मीडियावर पुण्यात बलात्कार हे वृत्त प्रकाशित झाल्यावर पुणे पोलिसांचे वाभाडे निघाले. पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर माध्यमांनी पुण्यातील पोलिसांनी एसटी महामंडळाचे वाभाडे काढले.
असा सापडला दत्तात्रय गाडे
घटनास्थळी उभ्या असलेल्या बसमधील पुरावे नष्ट होऊ नयेत, म्हणून ती बस सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. या बसमधील साहित्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. पुण्यातील रुग्णालयात तरूणीवर उपचार सुरू असताना तिचा जबाब नोंदविण्यात आला. बस स्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून गाडे तरुणीला बसमध्ये नेत असल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर तो बसमधून उतरून निघून गेल्याचेही त्यात दिसले आहे. पुटेजच्या आधारे गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मोबाईल क्रमांकावरून लोकेशन ट्रेस करण्यास प्रारंभ झाला. गेल्या काही दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींकडे चौकशी सुरू झाली. तेव्हा रात्री साडेदहाच्या सुमारात गावात एका नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी तो येऊन गेल्याचे समजले. तेव्हा त्याच्या तपासासाठी ड्रोनही उडविण्यात आले. पोलिसांनी तुझ्यावर ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवले आहे. तू जिथे आहेस, तिथून ताबडतोब पोलिसांना शरण ये. पोलिस तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत, अशी घोषणा ड्रोनच्याच माध्यमातून पोलिस सातत्याने देत होते. तेव्हाच एका कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर येऊन तो उभा राहिल्याचे एका पोलिसाने ड्रोनच्या कॅमेऱ्यातून पाहिले आणि लागलीच पोलिसांच्याडॉग स्क्वाड पथकाने शेतात जाऊन गाडेला ताब्यात घेतले.
राज्यभरात तीव्र पडसाद
राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी महिला संघटनांनी निषेध नोंदविला. शिवसेनेच्या वतीने तोडफोड करण्यात आली. पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली होती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. राज्यभर प्रकरण गाजल्यानंतर पोलिसांनी १४ पथके निर्माण केली आणि शिरूर जवळील गुणट गावात गाडे याचा शोध सुरू झाला.
ड्रोन च्या साह्याने शोध सुरू
ड्रोनच्य साह्याने आणि शंभर पोलिसांच्या माध्यमातून दिवस रात्र शोध सुरू होता. गुरुवारी मध्यरात्री तो गावातील एका महिलेकडे पाणी मागण्यासाठी आला होता. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी शेतांमध्ये त्याचा शोध घेतला आणि पावणेदोनच्या समोरच तो पोलिसांच्या हाती लागला. गाडेला अटक करून पोलिसांनी पुण्यात आणले आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात सादर केले जाणार आहे.