स्वारगेटच्या घटनेनंतर एसटी बसबाबत नियमावली कठोर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर, प्रतिनिधी : महामार्गांवर खासगी हॉटेल, ढाबा येथे थांबणाऱ्या एसटी बससाठी आता नवीन नियमावली तयार होणार आहे. तसेच सर्व बस स्थानकांमध्ये सीसीटिव्ही, एसटी तसेच पोलिस अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकांचे फलक लावणे, आगारांची वरचेवर पाहणी आदी बाबी बंधनकारक करण्यात येणार आहेत. जलसंपदा तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज यासंदर्भातील सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
स्वारगेटमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आता अधिक कठोर नियमावली तयार करावी लागणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राधाकृष्ण विखे यांनी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. लांब पल्ल्याच्या एसटी बस महामार्गावर ढाब्यांवर किंवा हॉटेलजवळ थांबतात. त्यांच्यासाठी आता नवीन नियमावली तयार होणार आहे. हॉटेल किंवा ढाबा चालक नियमांचे पालन करतात किंवा नाही, प्रवाशांना योग्य सुविधा मिळतात का, स्वच्छतागृह, त्या ठिकाणची सुरक्षा योग्य आहे किंवा नाही, याबाबत पाहणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील आगारांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. बंद गाड्यांच्या तपासणीची मोहीम हाती घेऊन तेथील सीसीटिव्ही कॅमेरे पोलिस ठाण्यांशी जोडण्यास सांगण्यात आले आहेत. सौर प्रकल्पांच्या सहाय्याने स्थानकात दिवे उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. बसस्थानकातील सोयींसाठी किंवा स्थानक उभारणीसाठी राज्य सरकारच्या निधीची वाट न पाहता बीओटी तत्त्वावर प्रकल्प तयार करण्याची सूचना राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. बसस्थानकाभोवती अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत त्यांनी सांगितले आहे.