फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
मनोरंजन

`इफ्फी`च्या वेब सिरीज स्पर्धेत `लंपन`

`इफ्फी`च्या वेब सिरीज स्पर्धेत `लंपन`

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : ५५ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ (इफ्फी) हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून (ता. २०) गोव्यात पणजी येथे सुरू होत आहे. यंदा वेब सिरीजच्या पुरस्कारांसाठी पाच वेब सिरीज स्पर्धेत असून निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’चा सुद्धा यात समावेश आहे. महोत्सवात मागच्या वर्षीपासून सर्वोत्कृष्ट वेबसिरीजसाठी पुरस्कार देण्यास सुरूवात झाली आहे.

देशातील आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचीही पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेणाऱ्या इफ्फी या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात आता ओटीटी माध्यमाचाही समावेश करण्यात आला आहे. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात इफ्फी होणार आहे. देशभरातील १० नामांकित ओटीटी कंपन्यांनी या पुरस्कारांसाठी अर्ज दाखल केले होते. गेल् यावर्षीपेक्षा यंदा या पुरस्कारांसाठी दाखल झालेल्या अर्जात ४० टक्क्याने वाढ झाली आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आलेल्या अर्जांपैकी या पुरस्कार विभागात ‘नेटफ्लिक्स’वरील ‘कोटा फॅक्टरी’ आणि ‘काला पानी’ या दोन वेबसिरीज, ‘सोनी लिव्ह’ वाहिनीवरील ‘लंपन’ ही मराठी वेबसिरीज, ‘अयाली’ ही ‘झी ५’ वाहिनीवरील तमिळ वेबसिरीज आणि ‘प्राईम व्हिडिओ’वरील ‘ज्यूबिली’ ही हिंदी वेबसिरीज अशा पाच वेबसिरीजना नामांकन देण्यात आले आहे. या पाचपैकी सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या वेबसिरीजला १० लाख रुपये रोख पुरस्कार स्वरूपात मिळणार असून वेबसिरीजचे निर्माते, दिग्दर्शक दोघांनाही यावेळी गौरवण्यात येणार आहे.

नव्या प्रतिभावंतांच्या कलाकृतींना संधी देण्यासाठी इफ्फी चित्रपट बाजारात ‘वर्क इन प्रोग्रेस लॅब’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विभागासाठी निवडण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ बादी यांचा ‘उमल’ (मराठी), त्रिवेणी राय यांचा ‘शेप ऑफ मोमोज’ (नेपाळी), शक्तीधर बीर यांचा ‘गांगशालिक – रिव्हर बर्ड’ (बंगाली), मोहन कुमार वालासला यांचा ‘येरा मांडरम’ (तेलुगु), रिधम जानवे यांचा ‘काट्टी री राट्टी’ (गड्डी, नेपाळी) आणि विवेक कुमार यांचा ‘द गुड, द बॅड, द हंग्री‘ (हिंदी) या चित्रपटांचा समावेश आहे.

मराठी चित्रपटाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपट इफ्फी फिल्म बाजार विभागासाठी पाठवला जातो. यंदा या विभागात ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘तेरवं’, ‘विषय हार्ड’ आणि ‘छबिला’ या चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिनेता – दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, छायाचित्रणकार – दिग्दर्शक महेश लिमये, संगीतकार अमितराज सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार मीना कर्णिक या पाच परीक्षकांच्या निवड समितीने या चार मराठी चित्रपटांची निवड केली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"