Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
पिंपरी-चिंचवड

१० हजार भीमसैनिक मुंबईतील आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात होणार सहभागी !

१० हजार भीमसैनिक मुंबईतील आरक्षण उपवर्गीकरण विरोधी  महामोर्चात होणार सहभागी !

चर्मकार समाजाची भूमिका निर्णायक; पिंपरीतील बैठकीत जोरदार नियोजन
पिंपरी : आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवार, दि. ३० जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या विराट महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे, यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. २७ जून) पिंपरी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातून तब्बल १० हजार भीमसैनिक महामोर्चात सहभागी होतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

viara vcc
viara vcc

मुंबईतील या महामोर्चाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद.भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार बाबुराव माने आणि बीआरएसपी चे अड. सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

बैठकीत मार्गदर्शन करताना राहुल डंबाळे यांनी सांगितले की, “आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना अनेकांमध्ये आहे. सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी आंबेडकरी समाज लोकशाही मार्गाने एकजुटीने आवाज उठवेल.”

कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “या लढ्यात चर्मकार समाज पूर्ण ताकदीने सहभागी होईल. हा संघर्ष राज्य शासनाच्या धोरणांविषयीचा असून कोणत्याही समाजाविषयी वैमनस्य निर्माण करणारा नाही. त्यामुळे सर्वांनी संयम आणि सामाजिक सलोखा जपत भूमिका मांडावी.”

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत म्हणाले, “हे आंदोलन कोणत्याही समाजाविरोधात नसून सरकारच्या धोरणांविरोधातील संविधानिक आणि लोकशाही मार्गाने लढला जाणारा संघर्ष आहे. या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. विचारांची लढाई विचारांनीच लढली जाईल.”

बैठकीस देवेंद्र तायडे, गुलाब पानपाटील, सुरेश रोकडे, रमेश चिमुरकर, दत्तात्रय गायकवाड, महेंद्र सरवदे, कमलेश वाळके, विनोद गायकवाड, संतोष जोगदंड, प्रल्हाद कांबळे, संजय ठोंबे, प्रमोद शेरे, विशाल कांबळे, राहुल बनसोडे, संजय वाघमारे, शंकर गायकवाड, विशाल भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी प्रमोद क्षिरसागर आणि राहुल सोनवणे यांनी शहरात आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जनजागृती आणि संघटन बळकट करण्यासाठी बैठका सुरू असून, त्याचाच भाग म्हणून आज रविवार २८ जुन २०२६ रोजी पिंपरी आंबेडकर स्मारक याठिकाणी बैठकीचा विस्तार होणार आहे. तरी मोठ्या संख्येने नागरिकांनी ३० जून रोजी मुंबई येथे होणाऱ्या विराट महामोर्चात सहभागी व्हावे,असे आवाहन केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"