‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’; राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक

‘महानगरपालिकेच्या वतीने प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी स्वीकारले प्रमाणपत्र
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त श्रेणीत’ संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल आज, बुधवारी (७ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्तांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.आयुक्त शेखर सिंह यांच्या वतीने प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.
मुंबई येथील मंत्रालयात मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त विठ्ठल जोशी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ या उपक्रमाचे अंतिम मूल्यमापन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त श्रेणीत’ संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. महानगरपालिकेच्या विविध सेवा, सुविधा नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेने प्रामुख्याने डिजिटल प्रशासन, पायाभूत सुविधा, स्वच्छता व तत्पर सार्वजनिक सेवा देण्यास प्राधान्य दिले होते. आता या उपक्रमात द्वितीय क्रमांक मिळाल्याने या क्षेत्रात महानगरपालिकेने एकप्रकारे स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे.
राज्यातील ४८ विभाग व विविध क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश
महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस सुधारणा कार्यक्रम’ मध्ये राज्यातील ४८ विभाग व विविध क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होता. या उपक्रमाचे गुणवत्ता परिषदेने (QCI) केलेल्या अंतिम मूल्यमापनात महापालिका श्रेणीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १०० पैकी ८५.७१ गुण मिळाले आहेत. तर, उल्हासनगर महापालिकेला (८६. २९ गुण) अवघ्या काही गुणांनी प्रथम क्रमांक मिळाला आहे.
