परतीच्या पालखीचे पिंपरीत स्वागत

पिंपरी, प्रतिनिधी : आषढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या आणि आता दर्शनानंतर परत येणाऱ्या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आणि आळंदी येथे परतणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे स्वागत अतिरीक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि चंद्रकांत इंदलकर यांनी केले. यावेळी पिंपरीगाव येथील काळभैरवनाथ मंदिर येथे विसाव्याच्या ठिकाणी आरती देखील करण्यात आली. या प्रसंगी माजी महापौर संजोग वाघेरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, उषा वाघेरे, प्रभाकर वाघेरे, मुख्य लिपिक वसीम कुरेशी तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दिघी येथे महापालिका क्षेत्रात आगमन झाल्यानंतर उप आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी महापालिकेच्या वतीने स्वागत केले. यावेळी प्रशासन अधिकारी नाना मोरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे तसेच एमएसएफ जवान आणि महापालिका कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.