फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
अध्यात्म पिंपरी-चिंचवड

चिंचवडच्या द्वारयात्रेला प्रारंभ

चिंचवडच्या द्वारयात्रेला प्रारंभ

चिंचवड : चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या परंपरेतील श्रावण द्वार यात्रा सुरु झाली आहे. श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर, श्री क्षेत्र चिंचवड येथून द्वारयात्रा सुरु झाली. आज पूर्व द्वारयात्रा झाली.

गाणपत्य सांप्रदायात द्वारयात्रा ही अत्यंत महत्वाची समजली जाते व या यात्रेमुळे सर्व पापे नष्ट होऊन गणेश स्वरुपाची प्राप्ती होते. ही द्वारयात्रा श्री क्षेत्र मोरगाव येथे भाद्रपद व माघ महिन्यात होते तर चिंचवड येथे ही द्वारयात्रा श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण शुद्ध चतुर्थी या चार दिवसात होते. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने निघणाऱ्या या द्वारयात्रेस शेकडो वर्षांची परंपरा आहे. चिंचवड गावाच्या चार दिशांना चार सिमाद्वारावर महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांनी द्वार देवतेची स्थापना केलेली आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून श्रावण शु. प्रतिपदा ते चतुर्थी अशा चार दिवसात चिंचवडगावच्या चारही दिशांच्या द्वाराला असलेल्या देवींच्या स्थानाला जाण्याची परंपरा आहे.

पूर्व द्वार संपन्न
आज सकाळी नऊ वाजता यात्रेसाठी चिंचवड येथील श्री मंगलमूर्ती वाड्यातून चिंचवड देवस्थानचे ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मंदार देव महाराज यांच्या समवेत सुमारे १०० ते १५० भाविकांचा समुदाय वाजत-गाजत निघाला. संजीवन समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेस प्रारंभ झाला. पूर्व द्वार असलेल्या एम्पायर इस्टेट सोसायटी, चिंचवड स्टेशन येथील श्री मांजराई देवी मंदिर, येथे द्वारदेवतेचे पूजन, श्रीमोरया गोसावी महाराजांनी रचलेली पदे व गोंधळ, जोगवा म्हणणे इ. धार्मिक विधी केले. त्यानंतर संजीवन समाधी मंदिर येथे धुपारती आणि द्वारयात्रेची सांगता होते. यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे महाप्रसादाचे वाटप केले.

सलग यात्रा !
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी दक्षिणद्वार असलेल्या पार्क वूड्स सोसायटी शेजारी, काळेवाडी येथील श्री आसराई देवी मंदिर येथे जाईल. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ०७) पश्चिमद्वार असलेल्या रामाडी डोंगर, निगडी येथील श्री ओझराई देवी मंदिर येथे जाईल. चौथ्या दिवशी गुरुवारी (ता. ०८) उत्तरद्वार असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर, आकुर्डी येथे श्री मुक्ताई देवी व श्री खंडोबा मंदिरात यात्रा दर्शनासाठी जाणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"