पिंपरी, प्रतिनिधी : जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना आणि अतिउष्णता वाढीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून नागरिकांचा बचाव या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने हिट ॲक्शन प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागासाठी २० जुलैपर्यंत अभिप्राय पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले की, हिट ॲक्शन प्लॅनचे पुनर्वोलकन करण्यासाठी तसेच योजनेसंदर्भात येणाऱ्या सूचना, प्रश्नांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. या अनुषंगाने नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजनंसाठी उपयुक्त ठरणार आहे.
शहरातील विविध भागांमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असले तरी रात्रीच्या वेळी तापमान कमी होण्यास अधिक वेळ लागत असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी प्रशासकीय आणि शहरी नियोजन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधा, जनजागृती, क्षमता निर्माण आणि तापमानाचा सर्वात जास्त परिणाम होणारे समूदाय ओळखून योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले आहे.
हिट ॲक्शन प्लॅनच्या आराखड्यात पूर्व चेतावणी प्रणालीची अंमलबजावणी, शीतकरण केंद्राची स्थापना आणि जागरुकता मोहिमांची अंमलबजावणी या उपायांचा समावेश असणार आहे. अति उष्णतेशी संबंधित धोके कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तापमान बदल व वाढत्या उष्णेतेबाबत पुरेशी काळजी आणि उपाययोजना न केल्यास उद्भवणाऱ्या मस्यांचा प्रत्येक घटकाला सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि उष्माघात यांचा समावेश असतो. याशिवाय त्वचेसंदर्भात समस्यादेखील उद्भवू शकतात. वातावरणातील कमाल तापमानात चार ते पाच डिग्रीपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली जाते.

का केला आहे हिट ॲक्शन प्लॅन?
- सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे
- सामुदायिक लवचिकता वाढविणे
- उष्णतेशी संबंधित आजारांवर नियंत्रण
- मृत्यूच्या घटना कमी करणे
- उष्णतेच्या लहरींच्या प्रभावांशी सामना
- पर्यावरणीय कार्यांचे सातत्त सुनिश्चित