संविधान भवन आणि विपश्यना केंद्रसाठी दोनशे कोटी रुपये

पिंपरी ( प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवडमध्ये संविधान भवन आणि विपश्यना केंद्र उभारण्यासाठी सुमारे दोनशे कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सभेमध्ये मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
पालिका सभा आणि स्थायी समितीची बैठक मुख्य प्रशासकीय इमारतीत झाली. अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, नगरसचिव चंद्रकांत इंदलकर आणि विषयाशी संबंधित विभागप्रमुख, अधिकारी या वेळी उपस्थित होते.
शहरात संविधान भवन आणि विपश्यना केंद्र निर्माण व्हावे, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली होती. त्याला अनुसरून संविधान भवन आणि विपश्यना केंद्र उभारणीसाठी सुमारे दोनशे कोटी रुपये रकमेच्या तरतुदीस आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हे प्रकल्प उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. हे काम लवकरच सुरू होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करणे, पिंपळे गुरव येथे बहुउद्देशीय इमारत व क्रीडांगण उभारणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयात रुग्णसेवेच्या दृष्टीने विविध उपकरणांची खरेदी करणे, विविध भागांतील रस्ते, नाले, प्रकल्प तसेच शहरात विविध ठिकाणच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांना या प्रस्तावांनाही बैठकीत मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या नेहरूनगर, रुपीनगर, थेरगाव, वाकड आणि निगडी येथील पाच शाळांमध्ये नाट्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या विद्यालयांमधील १२५ विद्यार्थ्यांना प्रभाकर पवार नाट्य कंपनीतर्फे नाट्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली.