महापालिकेचा बुजवलेल्या खड्ड्यांचा हिशेब

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरात विविध ठिकाणी असलेल्या एकूण खड्ड्यांपैकी महापालिकेने एक हजार ५८० खड्डे भरले असून सद्यस्थितीत फक्त ४२३ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
शहरातील विविध भागातील रस्त्यांवर दोन हजारांहून अधिक खड्डे आढळून आले होते. यंदा जूनच्या अखेर पावसाला सुरूवात झाली. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत दोन हजार ३ खड्डे आढळले होते. यापैकी एक हजार ६३९ खड्डे १३ जुलैपर्यंत आढळून आले होते. त्यानंतर २२ जुलैअखेर ३६४ खड्डे आढळून आले आहेत. महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने एक हजार ११, बीबीएमने म्हणजे खडीने ३५६, पेव्हिंग ब्लॉकने ६६, सिंमेंट कॉन्क्रीटने १४७ असे एक हजार ५८० खड्डे पूर्णतः बुजविले असून शहरात फक्त ४२३ खड्डे बुजवायचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
काय म्हणतात अभियंता?
या संदर्भात शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडताच तत्काळ मुरूम, खडी आणि सिंमेंट कॉन्क्रीटने खड्डे बुजविले जातात. पावसाळा संपल्यानंतर सर्व खड्डे पुन्हा नव्याने डांबराने भरण्यात येणार आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील १,५८० खड्डे भरले असून उर्वरित खड्डे बुजविले जात आहेत.