पिंपरी-चिंचवड महापालिकेची नवी इमारत

पिंपरी, प्रतिनिधी : वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा निर्णय झाला होता. हे काम प्रगतीपथावर असून, ते मुदतीत (जानेवारी २०२६) पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
नवीन इमारतीसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर समोरील ८.६५ एकर जागेची निवड करण्यात आली. या ठिकाणी सुमारे दहा लाख चौरस फूट बांधकाम केले जाणार आहे. सर्वसाधारण सभागृह ४५० आसन क्षमतेचे असणार आहे.
कशी असेल इमारत?
नवीन इमारत चार विंगमध्ये तयार होणार आहे. पहिल्या विंगमध्ये तीन तळघर, तळमजला आणि सहा मजले असतील. दुसऱ्या विंगमध्ये तीन तळघर, तळमजला आणि १८ मजले, तिसऱ्या विंगमध्ये तीन तळघर, तळमजला आणि १८ मजले तर चौथ्या विंगमध्ये तीन तळघर, तळमजला आणि सहा मजले असणार आहेत. इमारतीची उंची ८३ मीटर असणार आहे.
कामाचे आदेश जानेवारी २०२३ मध्ये देण्यात आले असून, मुदत ३६ महिने असणार आहे. त्यासाठीची स्विकृत निविदा २८६ कोटी ६३ लाख आहे. के. एम. व्ही. प्रोजेक्टस् ठेकेदार असून, सुनील पाटील असोसिएटस् प्रकल्प सल्लागार आहेत. हे काम मुदतीत करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन १५ मे २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महापालिकेची सध्याची इमारत ३७ वर्षांची जुनी आहे. तिचे उद्घाटन १३ मार्च १९८७ रोजी तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, राज्यपाल डॉ. शंकरदयाळ शर्मा, आमदार शरद पवार, महापौर ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर हनुमंत भोसले उपस्थित होते. त्यापूर्वी नगरपालिका आणि महापालिकेचे कामकाज खराळवाडी येथील प्रशासकीय इमारतीमधून चालत होते.
काय आहेत इमारतीची वैशिष्ट्ये?
- इमारतीची संपूर्ण रचना पर्यावरणपूरक
- जलपुर्नभरण, सौर ऊर्जा, पाण्याचा पुर्नवापर
- पाच हजार वाहनांच्या पार्कींगची सोय
- सर्वसाधारण सभा तसेच बहुद्देशीय सभागृह
- नागरिकांसाठी आरोग्य तपासणी क्लिनिक
- सुसज्ज ग्रंथालय अन् प्रदर्शन दालन
- कोर्टयार्ड, कॅन्टीन अन् पत्रकार कक्ष