तुम्ही कोणत्या बाटलीतून पाणी पिता?

निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायलं पाहिजे, असं डॉक्टर सांगतात. त्यामुळं घरातून बाहेर पडतानाच नव्हे तर अगदी प्रत्येकाच्या हातात घरातसुद्धा पाण्याची स्वतंत्र बाटली दिसेल. कोणी काचेची बाटली वापरतं, कोणी स्टील, कोणाला सतत पॅटर्न बदलून वापरण्यासाठी आकर्षक प्लॅस्टिकची बाटली आवडते तर कोणी तांब्याची बाटली वापरतं.पण नेमकी कोणती बाटली आरोग्यासाठी योग्य आहे, असा प्रत्येकाचा प्रश्न असेल.
बाजारात गेल्यावर पाणी पिण्याच्या बाटल्यांचे असंख्य प्रकार दिसतील. प्लास्टिक, स्टील, तांबं यातल्या अनेक आकर्षक बाटल्या आपलं लक्ष वेधून घेतात. पण यातल्या नेमक्या कोणत्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्याच्यादृष्टीनं सुरक्षित आहे. पर्यावरणाला हानिकारक असण्याबरोबरच आरोग्यासाठीही प्लास्टिकची बाटली अनेकजण नाकारतता. उन्हात याचा वापर करताना यातली घातक केमिकल्स पाण्यात मिसळतात.प्लास्टिकची वस्तू मजबूत करण्यासाठी बिस्फेनॉल ए (बीपीए) आणि काही रासायनिक घटक मिसळलेले असतात. याचा परिणाम हा कॅन्सरसारखा रोग बळावण्यापासून प्रजनन संस्थेत गुंतागुंत निर्माण करण्यापर्यंत होतो.
धातूच्या बाटल्या उत्तम
धातूची बाटली वापरणं हा एक चांगला पर्याय आहे. या बाटल्या प्लास्टिकच्या तुलनेत थोड्या महाग असतात. कोणतेही हानिकारक रसायनं धातूमध्ये नसतात. गार आणि गरम पाणी आपल्या सोयीनुसार यात ठेवून त्या त्या वेळी पाण्याचं तापमानही एकसारखं ठेवलं जातं. पण कोणता धातू आरोग्यासाठी अधिक चांगला आहे, ते ही जाणून घेऊ या.
स्टेनलेस स्टीलची बाटली
टिकाऊ वस्तू म्हणून स्टेनलेस स्टीलची निवड डोळेझाकून करू शकता. विषारी रसायनं पाण्यात मिसळली जाण्यापासून तुम्ही सुरक्षित राहाल. बाटलीची स्वच्छता ठेवणं खूप सोपं असतं, त्यामुळं बाटलीला कधीच वास येत नाही.
तांब्याची बाटली
पचनक्रिया सुलभ होण्यासाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तांब्याच्या धातूमध्ये साठवलेलं पाणी प्यावं, असं सांगतात. पण अम्लीय पेय पदार्थांवर याचा परिणाम होत असतो. द्रव पदार्थात या धातूची चवही उतरत असते. यातलं पाणी फार जास्त प्रमाणात प्यायलं तर आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
ॲल्युमिनिअमची बाटली
वजनाला हलकी आणि स्वस्त म्हणजे ॲल्युमिनिअमची बाटली. प्लास्टिकच्या तुलनेत ही वापरण्यास योग्य असली तरी कालांतरानं या धातूवरचं कोटिंग निघू लागतं. आणि यामुळं कदाचित डिमेंशिया, ॲनिमिया तसंच यकृत आणि पोटाचे विकार उद्भवू शकतात.