क्रिकेट अकादमीसाठी अंजिक्य रहाणेच्या नावे भूखंड?

मुंबई, प्रतिनिधी : भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना वांद्रे पश्चिम येथे क्रिकेट अकादमीसाठी देण्यात आलेला राखीव भूखंडावर अकादमी उभारण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर आता या भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याच्या उल्लेखासह पुन्हा एकदा मुंबई मंडळाकडे या भूखंडाची मागणी करण्यात आली आहे.
बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी हा भूखंड अजिंक्य रहाणेला देण्याची मागणी करणारं पत्र मंडळाला मिळालं असून या मागणीवर विचार सुरु असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे. सदर मागणीसंदर्भात लवकरात लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वांद्रे पश्चिममधील म्हाडाच्या मालकीचा हा भूखंड क्रिकेट अकादमीसाठी आरक्षित आहे. हा भूखंड क्रिकेट अकादमीसाठी आरक्षित करुन तब्बल 35 वर्ष झाल्यानंतरही त्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. हा भूखंड मागील 35 वर्षापासून जैसे थे स्थितमध्ये आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या मागणीच्या माध्यमातून या भूखंडाचं आणि अजिंक्य राहणेचंही नशीब पालटण्याची चिन्हं दिसत आहेत. आशिष शेलार यांची मागणी मान्य झाल्यास ज्या कारणासाठी हा भूखंड आरक्षित करण्यात आला आहे त्यासाठी म्हणजेच अंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी त्याचा वापर होईल, असं दिसत आहे. सदर भूखंडाच्या विकासासाठी आणि तिथे क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी राहणे उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे. आशिष शेलार यांनी हा भूखंड अजिंक्य रहाणेला द्यावा यासाठीचं शिफारसपत्र मंडळाला पाठवल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. विशेष म्हणजे शेलार यांनाही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
का चर्चेत आहे हा भूखंड?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआयचे खजिनदार तसेच भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांनी एका पत्राच्या माध्यमातून क्रिकेट अकादमीसाठी मंजूर झालेला मात्र गावसकर यांनी अकादमी उभारण्यास असमर्थता दाखवलेला भूखंड अजिंक्य रहाणेला द्यावा यासाठी मुंबई म्हाडा मंडळाला पत्र लिहिलं आहे. शेलार यांच्या या मागणीवर मंडळ विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. खरोखरच हा भूखंड अजिंक्य रहाणेला मिळाला तर तब्बल 35 वर्षांपासून या भूखंडाचा विकास होईल. मागील साडेतीन दशकांहून अधिक काळापासून या भूखंडाच्या विकासासंदर्भातील घोंगडं भिजत पडलं आहे.
काय किंमत आहे भूखंडाची?
सदर भूखंड हा 2 हजार चौरस फूट आकाराचा आहे. सुनिल गावसकर क्रिकेट फाऊंडेशनला हा भूखंड 1988 मध्ये देण्यात आला होता. मात्र 2022 मध्ये इथे आपल्याला क्रिकेट अकादमी उभारता येणार नाही असं म्हणत गावसकर यांनी असमर्थता दर्शवली. त्यानंतर 2022 मध्ये जून महिन्यात म्हाडाने गावसकरांना केलेलं या भूखंडाचं वितरण रद्द केलं होतं. हा भूखंड लिलावती रुग्णालयत आणि पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ आहे. येथील खासगी भूखंडाची किंमत प्रती चौरस फूट 50 हजार रुपये ते 1 लाख रुपयांदरम्यान आहे. त्यामुळे अगदी किमान किंमत म्हणजेच 50 हजार रुपये प्रति चौरस फूटने विचार केला तरी या भूखंडाची किंमत 10 कोटींच्या घरात जाते.