बहिणीची छेड काढल्याने तरुणाचा खून; तिघांना अटक!

पिंपरी : बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. वाकड येथील कावेरी नगर भाजी मंडई समोरील मोकळ्या जागेतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी शनिवार 19 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारुती बाळासाहेब बनसोडे (वय 35, रा. चिंचवड, मुळ-रा. परळी, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (वय 54,रा.मोशी)यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित दशरथ साळुंखे (वय 26 , रा.थेरगाव, मूळ- बारामती, पुणे), किशोर सुभाष वाघमारे (वय 39,रा. थेरगाव, मूळ- रा.बीड), भारत संजय पवार (वय 23, रा.थेरगाव, मूळ- बारामती) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती बनसोडे यांनी अमित यांच्या बहिणीची छेड काढली होती. याच कारणावरून आरोपींनी बनसोडे यांना तोंड ,गळा, हनुवटी आणि गुप्त भागावर जबर मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

धारदार गुप्तीसह तरुणाला अटक!
पिंपरी : शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना बेकायदेशीरपणे लोखंडी धारदार गुप्ती बाळगणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. चिखली जाधववाडी भाजी मंडई शेजारील मोकळ्या मैदानात रविवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई, संतोष भोर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओमकार संतोष झावरे (वय 29, रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहर परिसरात शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध आदेश लागू आहे. असे असताना आरोपीकडे धारदार लांब गुप्ती आढळून आली. पोलिसांनी गुप्ती जप्त करून त्याला ताब्यात घेतले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

