पोलिसाच्या अंगावर थार कार घालणाऱ्या तरुणाला अटक!

पिंपरी : रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्यानंतर ती थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर थार गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. वडगाव घेनंद ता. खेड येथे सोमवार दिनांक 21 सप्टेंबर दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये एका तरुणासह पोलीस जखमी झाले असून सरकारी वाहनाचे नुकसान झाले.

याप्रकरणी पोलीस शिपाई निरोज शेख यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुखदेव हनुमंत नाईक (वय 29, रा.आरग, ता. मिरज, जि. सांगली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश गोविंद मोरे (वय 20 रा. मेदनकरवाडी) हे या घटनेत जखमी झाले आहेत. नाईक याने त्याच्या ताब्यातील थार (एमएच 08/ बी जी/ 69 84) बेदरकार आणि निष्काळजीपणे चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. त्यामध्ये मोरे जखमी झाले. पोलिसांनी सहकार्यांच्या मदतीने थार कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर सरकारी वाहनालाही धडक दिली. पुन्हा पोलिसांच्या दिशेने वेगाने वाहन घालून त्यांना दुखापत केली. चाकण दक्षिण पोलीस तपास करत आहेत.

