यशवंतराव यांचे राजकारण समन्वयवादी होते : डॉ. श्रीपाल सबनीस

यशवंत – वेणू गौरव सोहळा संपन्न
पिंपरी : ‘यशवंतराव चव्हाण यांचे राजकारण समन्वयवादी होते म्हणून आताच्या राजकारण्यांनी यशवंतनीती स्वीकारावी’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, येथे गुरुवार, दिनांक २७ नोव्हेंबर रोजी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने लातूर येथील माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा पाटील कव्हेकर या दांपत्याला यशवंत – वेणू सन्मान प्रदान करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रुद्रवीर टेक्नो इंडस्ट्रीजचे संचालक विशाल पलांडे (यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार) आणि ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे (यशवंतराव चव्हाण सह्याद्री भला माणूस पुरस्कार) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘यशवंतराव आणि वेणूताई यांचे सहजीवन एकमेकांप्रति समर्पित होते. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या यशवंतरावांना सात्त्विक सुगंधी फुलाप्रमाणे असणाऱ्या वेणूताईंची साथ लाभली होती. शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि प्रतिभा पाटील कव्हेकर या दांपत्याचे सामाजिक कार्य खूप व्यापक आहे. कव्हेकर दांपत्य अंशत: यशवंत – वेणू यांचे सहजीवन जगत आहेत. त्यामुळेच ते यशवंत – वेणू गौरवासाठी पात्र आहेत!’ पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, ‘यशवंतराव यांनी विकासाची गंगा बहुजन समाजापर्यंत नेली!’ असे मत व्यक्त केले. सुनीताराजे पवार यांनी, ‘आपला देश कृषिप्रधान असूनही शेतकऱ्यांची दुरवस्था आहे. यशवंतराव राजकारणी असूनही त्यांना सांस्कृतिक बाबींची उत्तम जाण होती. वेणूताईंनी एखाद्या मंदज्योतीप्रमाणे त्यांना साथ दिली!’ असे विचार मांडले.
यशवंत – वेणू गौरव स्वीकारल्यानंतर शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी, ‘यशवंतराव हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. वेणूताईंनी त्यांची सावलीसारखी साथ केली. हे राज्य मराठ्यांचे नसून मराठीचे आहे, अशी यशवंतराव यांची भूमिका होती. २०४० मध्ये भारत महासत्ता होईल’ असा विश्वास व्यक्त केला. प्रतिभा पाटील कव्हेकर यांनी, ‘यशवंत – वेणू गौरव हा जीवनातला एक आनंदाचा क्षण आहे!’ अशी भावना व्यक्त करून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. विशाल पलांडे यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नातेवाईकांनी माझे शिक्षण केले, असे सांगितले; तर नंदकुमार मुरडे यांनी लालित्यपूर्ण शैलीतून कृतज्ञता व्यक्त केली.
वृक्षपूजन आणि नितीन देशमुख रचित ‘यशवंतराव’ या कवितेचे राजेंद्र वाघ यांनी केलेल्या गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. सुदाम भोरे यांनी स्वागत केले. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘यशवंतराव इतिहासाचं एक सोनेरी पान’ या विषयावर व्याख्यान दिले. मानसी चिटणीस यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. पंडित विद्यासागर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘केंद्र सरकारमध्ये चार महत्त्वाची खाती भूषविणारे यशवंतराव हे एकमेव महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्व होते!’ अशी माहिती दिली. अरुण गराडे, इंद्रजित पाटोळे, प्रतिमा काळे, जयवंत भोसले, प्रा. प्रभाकर दाभाडे, राजू जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. संगीता झिंजुरके यांनी आभार मानले.

