फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पिंपरी-चिंचवड

जागतिक योग आणि ध्यान दिवस हे विश्वमित्र ते विश्वगुरू कडे वाटचाल : अविनाश धर्माधिकारी

जागतिक योग आणि ध्यान दिवस हे विश्वमित्र ते विश्वगुरू कडे वाटचाल : अविनाश धर्माधिकारी

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचा हिंदू शौर्य दिनानिमित्त हिंदू मेळावा संपन्न
पिंपरी : जागतिक योग दिवस आणि ध्यान दिवस जगाने मान्य केला, ही भारताची विश्वमित्र ते विश्वगुरू कडे सुरू झालेली वाटचाल आहे. भारताचा विचार व संस्कृती जगभर वाढत आहे. भारतातील बहु विविधता हीच येथील एकतेचे यश आहे. मेकॉले च्या शिक्षण पद्धती पासून आपली संस्कृती विकृत करून शिकवली जात आहे. भारताला जागतिक भूमिका बजवायची असेल तर, प्रथम स्वतः समर्थ आणि सक्षम व्हायला हवे. विश्वमित्र होण्यासाठी वस्तुस्थितीचे भान ठेवून मोठी वाटचाल करायची आहे. विश्वमित्र व विश्वगुरू ही फक्त राजनैतिक संज्ञा नाही, तर सर्वांना एकत्र घेऊन समर्थ राष्ट्र म्हणून पुढे जाण्याची संकल्पना आहे. २१ जून हा जागतिक योग दिवस आणि २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस जगाने मान्य केला आहे. ही विश्वमित्र ते विश्वगुरू कडे सुरू झालेली वाटचाल आहे. यात भारत शंभर टक्के यशस्वी होईल मात्र त्यासाठी सर्वांचे योगदान अपेक्षित आहे. यामध्ये हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान हि संस्था खारीचा वाटा उचलत आहे असे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

viara vcc
viara vcc

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि.५ ऑक्टोबर) आरंभ बँक्वेट हॉल, भोईर लॉन्स, काळेवाडी पिंपरी येथे हिंदू शौर्य दिन, नवरात्र उत्सव व विजयादशमी चे औचित्य साधून “विराट हिंदू मेळावा आणि पुरस्कार वितरण” सोहळ्याचे आयोजन करण्यात होते. याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे “भारत, विश्वमित्र ते विश्वगुरू” या विषयावर व्याख्यान झाले. तसेच स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामराजे बेंबडे यांना ‘स्वर्गीय प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाज भूषण पुरस्कार २०२५’ आणि पिंपरीतील दै. लोकमतचे वृत्त संपादक डॉ. विश्वास मोरे यांना ‘स्वर्गीय संजय आर्य स्मृती पत्रकार भूषण २०२५’ हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, राजेंद्र गावडे, कुमार जाधव, बाबा त्रिभुवन, महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे मंत्री अर्जुन सोमवंशी, व्यंकटेश हलिंगे, सुरेश भोईर, सविता नाणेकर, ऋषिकेश नाणेकर, दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे, जयंत शोले, हरेश नखाते, नरेंद्र कुलकर्णी, गोपाळ माळेकर, गतीराम भोईर, सुदामराव मोरे, भास्कर रिकामे, महेश बारसावडे, तानाजी ऐकांडे, रवींद्र देशपांडे आदी उपस्थिती होते.

अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले की, विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना म्हणजे भारतीय संस्कृती होय. मानवासह सर्व प्राणी, निसर्ग, झाडे, डोंगर, चल, अचल जीवांचेही कल्याण व्हावे असे या प्रार्थनेत सांगितले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, स्वामी विवेकानंद यांनी देखील सर्वांच्याच कल्याणाची प्रार्थना केली आहे. वेदकाळापासून आताच्या वर्तमान काळापर्यंत सनातन विचारातून सत्य एकच आहे असे सांगितले जाते. फक्त जाणकार ते वेगवेगळ्या संकल्पनेतून मांडतात. तुम्हाला ज्या रूपात भावेल, त्या रूपात ईश्वराची पूजा करा, ही भारतीय संस्कृती आहे हे वेद शिकवते. ईश्वराला अल्ला म्हणा, गॉड म्हणा तरी तो एकच आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे सांगितले की, ईश्वर एकच आहे. सर्व धर्मांची जननी हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म निसर्गावर प्रेम करायला शिकवतो. निसर्ग हा लुटण्याचा विषय नाही तर जगण्याचा व जपण्याचा विषय आहे.

अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले की, आपली संस्कृती, आपला धर्म टिकविणे व पुढच्या पिढीमध्ये रुजवणे याची गरज आहे. हे महत्त्वपूर्ण काम हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान करत आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू धर्मावर चुकीची टीका टिपणी केली जाते. हे रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी पुढे आले पाहिजे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"