लाल मातीत चमकणारा कोहिनूर हिरा

- दिनेश गुंड (आंतरराष्ट्रीय पंच) तांत्रिक सचिव, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद
राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला. महाराष्ट्रातील गावोगावच्या जत्रांनी कुस्तीला लोकाश्रय दिला. तसेच आंतरराष्ट्रीय पंच प्रा. दिनेश गुंड यांनी कुस्तीला कुटुंबाश्रय दिला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कुस्ती क्षेत्रात बापलेकीने शिवछत्रपती पुरस्कार मिळवून अनोखा इतिहास घडविला आहे. त्याचा संपूर्ण पंचक्रोशीला निश्चितच अभिमान आहे.
जागतिक दर्जाचे पंच प्रा. गुंड यांनी आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वगुणाचे कौतुक तर करतातच परंतु, ते महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करतात. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक सचिव म्हणून कार्यरत असणारे प्रा. गुंड म्हणाले, शहर असो किंवा खेडेगाव. कुस्तीचा छंद अजूनही जोपासला जातो आहे. वस्तादगिरी आणि कुस्तीचे शिलेदार गावपांढरीचा कसदारपणा जपत आहेत. मैदानावर खडी सलामी देत हजारो शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ताईत बनणारे वीर कमी नाहीत. ते वर्षभर मातीची रग जपून गावोगावच्या मानाच्या गदा खांद्यावर घेण्यासाठी अजूनही उत्सुक आहेत. त्यामुळेच शड्डू ठोकत पैलवानकीची ऊर्मी जागवत वारे व्वा पठ्ठ्याची आरोळी ऐकण्यासाठी कित्येकजण आजही आतुर असतात. याच लाल मातीत चमकणारा कोहिनूर हिरा म्हणजे आमदार महेशदादा लांडगे होत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

प्रा. गुंड सर म्हणाले, महेशदादांच्या घराण्याला पहिलवानकीची मोठी परंपरा आहे. त्यांचे वडील आणि चुलते यांचे क्रीडा क्षेत्रासाठी योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच कुस्तीतील डावपेचांची महेशदादांना जाण आहे. एकलंगी टांग, आतली व बाहेरची टांग, मुलतानी, धोबीपछाड, घिस्सा, लुकान, उखड, स्वारी, कलाजंग, हरणफास यांच्या अभ्यासाबरोबरच विरोधकांचा पट काढण्यात ते पटाईत आहेत. प्रसिस्पर्ध्यांच्या तावडीतून निसटण्याच्या दसरंग, डंकी वा डूब या तोडी त्यांना माहित आहेत. चाकोरीबाहेर जाऊन तळागाळातील सामान्य नागरिकांना मदत करण्याची कला त्यांनी अवगत केली आहे. ते खेळाडूंच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
मुलगी अंकिता, मुलगा आदर्श यांना नेहमी प्रोत्साहन देणारे दादा आमच्या कुटुंबातील एकप्रकारचे सदस्य आहेत. अंकिताला छत्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा स्वतः घरी येऊन त्यांनी अभिनंदन केले. तिला प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे तर अनेक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करून सत्कार केला. माणूस म्हणून ते खूप प्रेमळ आहेत. अडचणीला धावून जाणारे सच्चे मित्र आहेत. अडचणीच्या कामासाठी मी त्यांना एकदा फोन केला. त्या वेळी त्यांनी मेसेज करून विधीमंडळाच्या अधिवेशनात असल्याचे कळविले. कामकाज आटोपल्यानंतर त्यांनी मध्यरात्री पाऊण वाजता फोन करून विचारपूस केली. त्यांची ही पद्धत हृदयात कोरून ठेवण्यासारखी आहे, असे प्रा. गुंड सरांनी आवर्जून सांगितले.
शहर असो किंवा खेड्यातील खेळाडूंना त्यांनी नोकरीच्या माध्यमातून मदत केली आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटविला आहे. याशिवाय खेळाडू घडविण्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प राबविले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, भोसरी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कै. मारुतराव रावजी लांडगे कुस्ती संकुल होय. या ठिकाणी ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव आणि मुंबई केसरी अजय लांडगे हे दर्जेदार खेळाडू घडवित आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी सुसज्ज घाट, कबड्डी प्रशिक्षण केंद्र, योग प्रशिक्षण केंद्र या प्रकल्पांच्या माध्यमातून भोसरी गावजत्रा मैदानाला क्रीडा हब अशी नवी ओळख निर्माण करून दिली आहे.
प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन होत असते. या वेळी उपस्थित राहून दादा कुस्तीगीर आणि अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना करतात. त्यांच्या अडचणी सोडवितात. त्यामुळे संयोजकांना बळ प्राप्त होते. स्पर्धा यशस्वी होण्यास मदत होते. गेल्या एकदोन वर्षांपासून दादांना क्रीडा मंत्रीपद हुलकावणी देत आहे. यंदा तिसऱ्यांदा आमदार होऊन ते भविष्यात क्रीडा मंत्री व्हावेत, याच माझ्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळण्यास मदत होईल. कुस्तीगीरांमदध्ये चैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा प्रा. गुंड यांनी व्यक्त केली आहे.