बांधकाम साहित्य नेताना चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू ;दोघे अटकेत!

पिंपरी : बांधकाम व्यावसायिक व बिल्डिंग मालक यांनी बिल्डिंगचे काम करीत असताना कामगारांना जिन्यातून बांधकाम साहित्य घेऊन जाण्यास सांगितले. मात्र जिन्याला संरक्षक कठडा नसल्याने एक कामगार चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी पडला.ही घटना 12 मार्च 2026 रोजी सर्वे नंबर 24, सेवन स्टार सिटी, मारुंजी येथील बांधकाम साइटवर घडली .

याप्रकरणी श्रीमती ताराबाई बाळासो महांगरे (वय 60, राजू विनोदे यांची रूम, जुना जकात नाका, हिंजवडी, ता. मुळशी, मुळगाव- विंग, ता खंडाळा, जि. सातारा) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बिल्डिंग मालक व्यंकट रामानौ सांगना (वय 48 ,रा. पुणे), बांधकाम ठेकेदार संजय रामसुख राजभर (वय 25, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी कामगारांना जिन्यातून बांधकाम साहित्य वरच्या मजल्यावर घेऊन जाण्यास सांगितले. जिन्याला सुरक्षा जाळी कठडा व कामगारांना सुरक्षिततेची साधने न देता जिन्यातून ये जा करीत असताना तोल जाऊन अशोक महांगरे हा कामगार चौथ्या मजल्यावरून पडून मरण पावला. आरोपींनी बांधकाम साइटवर जाणीवपूर्वक सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता कामगारांना काम करण्यास सांगितल्याने महांगरे यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांदे तपास करत आहेत. बांधकाम साहित्य नेताना चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू ;दोघे अटकेत

