फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

मतदानाच्या बोटावर सवलतींच्या ऑफर्स

मतदानाच्या बोटावर सवलतींच्या ऑफर्स

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
मुबंई, प्रतिनिधी : राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून त्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नेहमीच वेगवेगळे प्रयत्न होताना दिसतात. यातच खासगी व्यावसायिक सुद्धा आता पुढाकार घेत आहेत. मतदान केलेल्या बोटाची शाई दाखवून वेगवेगळ्या सवलती देण्यासाठी आयोगाने यंदाही पुढाकार घेतला आहे.

व्यापारी, मल्टिप्लेक्स मालक आणि रेस्टॉरंट मालकांच्या संघटनांशी चर्चा करून मतदानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने निवडणूक आयोगाने नुकताच ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला. हा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे झाला. यावेळी निवडणूक आयोग, मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासह अभिनेत्री वर्षा उसगावकर, मोहन जोशी, रोहित शेट्टी आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या संकल्पनेतून हा सवलतीचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मुंबईचे नोडल निवडणूक अधिकारी फारोग मुकादम यांनी दिली.

मतदान करणाऱ्या नागरिकांना शहरातील पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, स्टर्लिंग, मुक्ता, मूव्हीमॅक्स आणि मूव्ही टाइम या मल्टिप्लेक्स साखळींनी २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत २० टक्के सवलत देण्याचे मान्य केले आहे. मतदानाची शाई लावलेले बोट दाखविल्यास ‘एएचएआर’ने २० व २१ नोव्हेंबर रोजी जेवणावर १० ते २० टक्के सवलत दिली आहे, अशी माहिती मुकादम यांनी दिली. ऑनलाइन बुकिंग किंवा खरेदीसाठी ही ऑफर वैध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र रिटेल असोसिएशन आणि रिलायन्स रिटेल आउटलेट्स २० नोव्हेंबरला १० ते १५ टक्के सूट देतील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहरातील अनेक रेस्टॉरंट्स आणि किरकोळ दुकानांनी स्वत:हून अशीच सवलत दिली होती.

गगराणी यांनी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन, असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट्स आणि इतर काही व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत ३१ ऑक्टोबर रोजी बैठक घेतली. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मतदारांना सवलत देण्याचे त्यांनी मान्य केले. ते अनेकदा इतर प्रसंगी सवलत देतात, त्यामुळे मतदानासाठी हीच सवलत देता येईल का, अशी विचारणा करण्यात आली. त्यांचा प्रतिसाद सकारात्मक होता, असे मुकादम यांनी सांगितले.

पुण्यात कुठे मिळेल सवलत?
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता जिल्हाप्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता पूना होटेलियर्स असोसिएशनने स्वत:हून पुढाकार घेतला आहे, याबाद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने या उपक्रमाबद्दल असोशिएनचे आभार मानले आहेत.

पूना हॉटेल असोसिएशनशी संलग्न हॉटेल्समध्ये या सवलतीचा लाभ घेण्याकरीता मतदान केल्यानंतर बोटाची शाई दाखवून देयकावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. मतदारांनी आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे. पूना होटेलियर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या ७४ हॉटेल्समध्ये मतदारांना सवलत मिळणार आहे. २० व २१ नोव्हेंबर २०२४ रोजी १० टक्के सूट देण्यात येणार आहे, येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करुन या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.

हे ही वाचा : मतदानाला कोणते ओळखपत्र न्याल?
the-office-of-the-chief-electoral-officer-has-informed-that-voting-can-be-done-after-showing-any-one-of-the-12-types-of-identity-proof-while-voting

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"