गावी जमीन घेण्यास विरोध केल्याने या रागातून पत्नीचा खून!

पिंपरी : गावी शेतजमीन घेण्यास पत्नीने विरोध केल्याने याचा राग मनात धरून पतीने पत्नीशी भांडण करून धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तिचा खून केला. शुभांगी आकाश बारस्कर (वय 28) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. ही घटना रविवार 20 सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार ते साडेपाच या दरम्यान देहुगाव तालुका हवेली येथे घडली.

या प्रकरणी सतीश मारुती काईत (वय 56, रा. मु. पो. बागणी, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश रामदास बारस्कर (वय 31, रा. वाघा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर, सध्या रा. देहूगाव, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे जावई आरोपी आकाश बारस्कर यांना गावी शेतजमीन घेण्यासाठी फिर्यादी यांची मुलगी शुभांगी आकाश बारस्कर ((वय 28) हिने विरोध केला. त्याचा राग मनात धरून पत्नी शुभांगी हिचे सोबत आरोपीने नेहमी वाद करून तसेच ती तीन महिन्याची गरोदर असताना देखील तिची काळजी न घेता तिच्याशी भांडण केले. या भांडणातून आरोपीने धारदार शस्त्राने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माने, पोलीस निरीक्षक गुन्हे जानकर हे तपास करत आहेत.
कंपनीतील कामगाराने 4 लाख 14 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरला!
पिंपरी : इंजीनियरिंग वर्कशॉप मधील विविध प्रकारचे साहित्य, स्क्रॅप, कार्बाइड इन्सर्टचा तुकडा असा एकूण 4 लाख 14 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल कंपनीतील कामगाराने चोरी केला. ही घटना 26 जुलै ते 29 ऑगस्ट या दरम्यान श्री युनिक्रेट इंजीनियरिंग वर्कशॉप, बी 3, एच ब्लॉक पिंपरी एमआयडीसी येथे घडली.
या प्रकरणी रमेश हरिभाऊ लबडे (वय 61, रा. रविराज हरिटेज, भाऊ पाटील रोड, बोपोडी यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत कुमार (वय 36, रा. सेक्टर 16, शिवाजीनगर, जाधववाडी, चिखली, मूळ पत्ता- एस/ ओ माणिकराव भोगाशेट्टी, पो. बोलेवाड, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्री युनिक क्रिएट इंजीनियरिंग वर्कशॉप येथील विविध प्रकारचे साहित्य , स्क्रॅप, कार्बाईड इन्स्टर्टचा तुकडा असा एकूण 4 लाख 14 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल कंपनीतील कामगार प्रशांत कुमार यांनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेला. संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेटे तपास करीत आहेत.

