‘चिल्लर’ कोरटकर कुठे पळाला? इंद्रजीत सावंतांचा संतप्त सवाल!

कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरत आहे. प्रशांत कोरटकर कोलकातामार्गे दुबईला फरार झाल्याची चर्चा असून याबाबत त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. अशातच यावर इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी हा विषय चिल्लर आहे असं न समजता गांभीर्याने घेण्याचा विषय म्हटलं आहे.
शिवद्रोही प्रशांत कोरटकर याने शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याने धमकी देऊन सुमारे दोन आठवडे उटलून गेले तरीही तो पोलिसांच्या हाताला लागत नाही. तो दुबईत गेल्याचे फोटो समोर येत आहेत, तसे वृत्तही आले आहे. असे जर असेल तर मंत्रालयातून त्याला मदत करणारे कुणीतरी आहे, असे म्हणावे लागेल. चिल्लर माणूस पोलिसांची दिशाभूल करून परदेशात पळाला, हे गृहखाख्याचे अपयश आहे, अशी टीका करीत शिवरायांचा अपमान करणाऱ्याला मंत्रालयातून कोण मदत करतो आहे, त्याचा बुरखा फाडलाच पाहिजे, असे इंद्रजीत सावंत म्हणाले.
कोरटकरला वाचवण्यासाठी कोणती यंत्रणा प्रयत्न करतेय – इंद्रजित सावंत
वकील असीम सरोदे यांच्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काही पुरावे असतील तर ते वेळ आल्यावर समोर आणतील. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट घ्यावा, यासाठी पोलिसांना आम्ही अर्ज दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय चिल्लर आहे असं न समजता गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा त्याने अपमान केला आहे. यामुळे सर्व शिवभक्तांची मन व्यथित झालंय. अनेक आंदोलन झाली आहेत याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यायला हवी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये तातडीने लक्ष घालून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कारवाई करावी. कोणती तरी यंत्रणा आहे ही या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे अशी शंका आहे, असेही इंद्रजित सावंत म्हणाले.