सर्व समाजाला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार : ना. अण्णा बनसोडे

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा “अब की बार 75 पार” चा नारा..
पिंपरी : “अब की बार 75 पार” चा नारा देत सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार विधानसभा उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्याचे सह संपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. सह संपर्क मंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत शहरातील राजकीय, संघटनात्मक आणि विकासकामांचा विस्तृत आढावा घेण्यात आला.

आगामी दौऱ्यात महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या सोबत बैठक घेऊन रखडलेल्या कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली. जुळे सोलापूरसह विविध भागातील करदात्यांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही मत पदाधिकाऱ्यांनी मांडले.
लिंगायत, पद्मशाली, बौद्ध, मुस्लिम तसेच सर्व समाजांना सोबत घेऊन सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. अजित दादांनी पुणे–पिंपरी चिंचवडचे विकास मॉडेल सोलापूरमध्ये आणावे. महात्मा बसवेश्वर स्मारक व वीरशैव लिंगायत भवनासाठी अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली. शहराच्या विकासासाठी जे पक्ष सोबत येतील त्यांच्यासोबतच आगामी महानगरपालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
शहरातील पक्षाची ताकद अधिक बळकट करण्यासाठी वार्डनिहाय बैठकांचे आयोजन, शहरात जास्तीत जास्त दौरे, तसेच पक्षविस्तारावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे सह संपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी बैठकीत ग्वाही दिली. पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणार. सर्व समाजाला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार. पदाधिकाऱ्यांना पक्षाची, शासनाची आणि वैयक्तिक ताकद देऊन सोलापूरच्या विकासासाठी संपूर्ण ताकदीने काम करणार, असा विश्वास ही विधानसभा उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्याचे सह संपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी आढावा बैठकीत दिला.

