फक्त मुद्द्याचं!

6th September 2025
पिंपरी-चिंचवड

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी समन्वयाने काम करावे : आयुक्त शेखर सिंह

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी  समन्वयाने काम करावे : आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतली सार्वजनिक गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात उत्सवांचा आनंद घेताना पर्यावरणाचे संरक्षण हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. यंदाही सार्वजनिक गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांच्या सहकार्याने प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यासोबत विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले.

viara vcc
viara vcc

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, पर्यावरण प्रेमी यासह नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेली बैठक आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता अनिल भालसाकळे, माणिक चव्हाण, उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, सहायक आयुक्त निवेदिता घार्गे, किशोर ननवरे, अश्विनी गायकवाड, अमित पंडित, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, कार्यकारी अभियंते सोहन निकम, बी. पी. लांडे, सचिन नांगरे, चंद्रकांत मुठाळ, शिवराज वाडकर, सुनील नरोटे, हेमंत देसाई, सुनील शिंदे, विजय जाधव, उपअभियंता योगेश आल्हाट, प्रशांत कोतकर, संजय जाधव यांच्यासह गोराबा काका मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कुंभार, कुंभार समाज महाराष्ट्राचे सरचिटणीस संजीव भालेराव, अष्टविनायक मंडळाचे रमेश करटकर, विश्व हिंदू परिषदेचे विजय देशपांडे, शिवशंकर घोडके , पर्यावरण संरक्षण गतिविधी संस्थेचे सुधीर माडलकर, दीपक लापस, श्रीस्वामी समर्थ केंद्राच्या सरोज दाणी, मूर्तिकार महेश डाखवे, राजाराम डाखवे, मृणालिनी पाटील, लिबर्टी अर्थ वेअर आर्ट्सच्या तृप्ती मानुरकर, इको एक्झिस्ट फाउंडेशनच्या शामा देव, मैत्रेय घोरपडे आदी उपस्थित होते.

आयुक्त सिंह यांनी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापालिकेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. यंदाच्या गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी महापालिकेने कृत्रिम हौदांची संख्या १६ वरून ३२ वर नेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. शाडू मातीच्या मूर्तींसाठी विशेषतः १६ नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार असून पीओपी मूर्तींसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे मूर्तींचे योग्य वर्गीकरण, पर्यावरणपूरक विसर्जन आणि सुलभ व्यवस्थापन शक्य होईल. मूर्ती विक्रेत्यांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिक, गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले.

पुनरावर्तन’ मोहीम राबवली जाणार
पिंपरी चिंचवड महापालिकेत यंदा गणेशोत्सव काळात इको एक्झिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने ‘पुनरावर्तन’ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर ती माती पुन्हा संकलित करून मूर्तिकारांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर मूर्तिकार ती माती पुन्हा मूर्तीसाठी वापरू शकणार आहेत.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना महापालिकेच्या प्रत्येक विभागाने या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. पीओपी आणि शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य देऊन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले.

गणेशोत्सव काळात विसर्जन व्यवस्थापन अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याच्या दृष्टीने कृत्रिम हौदांची संख्या वाढवण्याचे नियोजन आहे. आज झालेल्या बैठकीत विविध स्वयंसेवी संस्थांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर देखील भर दिला जाणार आहे. — संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"