चिखली जलशुद्धीकरण केंद्राच्या अखत्यारीतील भागात गुरूवारी पाणीपुरवठा बंद!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषण कंपनीच्या भोसरी आर.एस. उपकेंद्र येथे गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत तातडीची वीजपुरवठा देखभाल व दुरुस्तीची कामे होणार आहेत. याकाळात वीज पुरवठा खंडित राहणार असल्याने चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे गुरुवारी शहरातील या केंद्राच्या अखत्यारीत असणाऱ्या बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर सेक्टर ४, ६, ९, ११ व १२, शिवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोवीसावाडी व इतर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागात शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.