८ नोव्हेंबरला “वॉकेथॉन फॉर मतदान ”

सिनेअभिनेत्री श्रेया बुगडे यांची उपस्थिती
पिंपरी : मतदार जनजागृती व राज्यस्तरीय स्वीप प्रक्षेपण (लॉंचिंग) कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेचे वतीने ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता निगडी येथील इंदिरा गांधी उद्यान (दुर्गादेवी टेकडी) येथे “वॉकेथॉन फॉर मतदान ” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृतीपर उपक्रम स्वीप कार्यक्रमांतर्गत राबविण्यास भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्यभर स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ नोव्हेंबर२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्यभर राबवीत असलेल्या स्वीप कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता “वॉकेथॉन फॉर मतदान ” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
निगडी येथे होणा-या कार्यक्रमास सुप्रसिद्ध हास्यकलाकार-सिनेअभिनेत्री श्रेया बुगडे यांची उपस्थिती राहणार आहेत. मतदार जनजागृती करण्यासाठी श्रेया बुगडे या उपस्थित नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच याठीकाणी मतदार जनजागृतीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, नवमतदार आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी केले आहे.