श्रेया बुगडे यांच्या माध्यमातून ‘वॉकेथॉन फॉर मतदान जनजागृती!

पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रभातफेरी, फ्लॅश मॉब व पथनाट्याद्वारे केली मतदान जनजागृती
पिंपरी : अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या माध्यमातून करण्यात येणारी मतदान जनजागृती… ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि लोकशाहीच्या जागृतीसाठी निघालेली शेकडो जणांची प्रभातफेरी…असे उत्साहपूर्ण वातावरण आज सकाळी निगडी येथील दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी निर्माण झाले होते.

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत विविध मतदान जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दुर्गादेवी टेकडी परिसरात ‘वॉकेथॉन फॉर मतदान’ या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवण्यात आला,या जनजागृतीपर कार्यक्रमात जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक, युवक, महिला सहभागी झाले होते.
दुर्गादेवी टेकडी ,निगडी येथील मुख्य रस्त्यापासून ते पायथ्यापर्यत अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते मतदान जनजागृती करणाऱ्या पत्रकांचे प्रतिनिधिक स्वरूपात निसर्गप्रेमी तसेच नागरिकांना वाटप करून या मतदान जनजागृती प्रभातफेरी कार्यक्रमाची सुरुवात झाली. मतदान जनजागृतीसाठी यावेळी सादर करण्यात आलेल्या फ्लॅश मॉबने उपस्थितांची विशेष मने जिंकली. तसेच प्रभावी संदेश देणारे पथनाट्य सादरीकरणही करण्यात आले. या सादरीकरणांमधून मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी ठळकपणे अधोरेखित करण्यात आली.
याप्रसंगी अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणाल्या, ‘पिंपरी चिंचवड महापालिका मतदान जनजागृतीसाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत आहे, हे कौतुकास्पद आहे. मतदान हा आपला हक्कच नाही तर कर्तव्य देखील आहे. आपल्या पुढील पिढीसाठी येत्या १५ जानेवारीला नक्की मतदान करा. युवकांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करून इतरांना देखील यासाठी प्रोत्साहित करावे. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस न समजता मतदान करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे,’ असे देखील त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

