वाकड दत्त मंदिर रस्तारुंदीकरणाची पोलिस बंदोबस्तात कारवाई!

४० पत्राशेड आणि दोन पक्क्या इमारती पाडल्या
पिंपरी : वाकड दत्त मंदिर येथील ४५ मीटर रस्तारुंदीकरणाच्या कारवाईविरोधात स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सोमवारी (6 जानेवारी) आंदोलन केले. मात्र, पालिका प्रशासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात कार्यवाहीला सुरवात केली आहे.
पालिकेच्या विकास आराखड्यात वाकड दत्त मंदिर रस्ता ४५ मीटर रुंद दर्शविला आहे. मात्र, अनेक ठिकाणी तो २० ते ३० मीटर रुंद होता. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या मागणीने जोर धरला होता. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांतील रहिवासी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनाने यापूर्वीत नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून कारवाईबाबत ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून सूचित केले होते. स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते.
कारवाईसाठी पालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कोलपे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रशासनाचे पथक या ठिकाणी दुपारी अकराच्या सुमारास दाखल झाले. समवेत साठपेक्षा अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, तसेच दोनशे कर्मचारी, पोकलेन, जेसीबी असा मोठा ताफा होता. ते पाहून स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध दर्शविला. मुदत मिळावी, अशी मागणी केली. एकतर्फी कारवाई न करता दोन्ही बाजूंनी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पालिका प्रशासनाने स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती केली. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा करीत होते. त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून कारवाईचा निषेध केला. परिसरातील वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रशासनाने परिसरातील शंभरहून अधिक अनधिकृत बांधकामांपैकी ४० पत्राशेड आणि दोन पक्क्या इमारती पाडल्या. पुढील काही दिवस कार्यवाही चालूच राहिल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.