भारतात अस्थिरता माजविण्यासाठी ‘यूएसएआयडी’चा ५ हजार कोटींचा निधी!

भाजप खासदाराच्या गंभीर आरोपाने खळबळ
नवी दिल्ली : अमेरिकेतील ‘यूएसएआयडी’ यांनी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलेल्या संस्थांची सरकारने चौकशी करावी. यापैकी बहुसंख्य संस्थांनी भारतात अस्थिरता पसरविण्यासाठी काम केल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी लोकसभेत केला आणि या संस्थांचे काँग्रेस पक्षाशी लागेबांधे असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक सदस्यांनी दुबे यांच्या वक्तव्याला जोरदार हरकत घेतली.
‘यूएसएआयडी’ने निधी उपलब्ध करून दिलेल्या संस्थांनी सरकारच्या ‘अग्निवीर’विरुद्ध निदर्शने केली. जातनिहाय जनगणनेच्या मागणीला पाठिंबा दिला आणि देशातील नक्षलवादाला खतपाणी घातले, असेही दुबे म्हणाले.
अमेरिकेतील संस्था ‘यूएसएआयडी’ने भारतात अस्थिरता माजविण्यासाठी विविध संस्थांना पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा निशिकांत दुबे यांनी सोमवारी लोकसभेत केल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी असलेल्यांची रवानगी कारागृहात करावी, अशी मागणीही दुबे यांनी केली.
अध्यक्षपदी येताच ट्रम्प यांनी अमेरिकन ‘एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ला (यूएसएआयडी) वेसण घातली आहे. ‘यूएसएआयडी’कडून उद्योगपती जॉर्ज सोरोसच्या संघटनांना २६ कोटी डॉलर मिळाल्याचा आरोप ट्रम्प यांनी आधी केला होता. सोरोसने या पैशांचा वापर भारत आणि बांगलादेशसह अनेक देशांत अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि राजकीय क्षेत्रात ढवळाढवळ करण्यासाठी केला, असा दावाही ट्रम्प यांनी केला होता.
शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करताना दुबे यांनी सांगितले की, ही संस्था अनेक वर्षांपासून विविध सरकारे पाडण्यासाठी आर्थिक ताकद लावत होती.‘यूएसएआयडी’ने जॉर्ज सोरोसच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ला भारताचे तुकडे पाडण्यासाठी पाच हजार कोटी रुपये दिले होते की नाही, त्याने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे दिले होते की नाही, हे आता विरोधी पक्षांनी सांगावे, असेही दुबे म्हणाले.
दरम्यान, निशिकांत दुबे यांनी आरोप केल्यानंतर काँग्रेसचे सदस्यही आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.