टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन महिलांचा मृत्यू!

पिंपरी : टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका १७ वर्षीय तरुणी आणि एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि ६)रात्री भोसरी येथे गृहलक्ष्मी कॉलनीकडून सदगुरुनगर कमानकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. कादंबरी काशिनाथ गादेकर (वय १७) आणि प्रतिभा कृष्णा आंबटवार (वय ३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी काशिनाथ पाडूरंग गादेकर (वय ४१, भोसरी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत सोपान वाडेकर (वय ३६, शिरोली, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. हनुमंत वाडेकर त्याच्या ताब्यात असलेला साऊंड सिस्टीम टेम्पो वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वेगाने चालवत होते. त्याने फिर्यादीची मुलगी कादंबरी आणि मेव्हण्याची पत्नी प्रतिभा आंबटवार यांना जोरात धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळी न थांबता पळून जात असताना लोकांनी त्याला पकडले.
जुन्या भांडणातून तरुणांवर दगडफेक
बावधन : जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (७ ) रात्री बकाजी कॉर्नर, बावधन येथे घडली. याप्रकरणी कार्तिक नंदकुमार दगडे (वय १९, बावधन) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईराज दगडे आणि विशाल भुंडे (बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बावधन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आणि त्याचा मित्र हर्षल भुंडे अफरोज यांच्या सोबत घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली. अफरोज भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना, विशाल भुंडेने रस्त्यावरील दगड उचलून कार्तिकच्या डोक्यात मारला. साईराज दगडेने हर्षलच्या उजव्या हातावर दगड मारून त्याला किरकोळ जखमी केले. त्यानंतर विशालने अफरोजच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले.