फक्त मुद्द्याचं!

13th April 2026
पिंपरी-चिंचवड

एम. ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ!

एम. ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी घेतला निर्णय
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेचा शंभर टक्के वापर व्हावा, तसेच महापालिकेचा व्यवहार अधिक सोपा, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावा, या उद्देशाने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव महापालिकेच्या विधी समितीच्या विशेष बैठकीत करण्यात आला आहे. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समितीची बैठक सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, कुशाग्र कदम, वर्षा जगताप, तुषार सहाणे, कुंदा भिसे, शेखर चिंचवडे यांच्यासह महापालिका सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त राजेश आगळे उपस्थित होते.

राजभाषा मराठीतून कामकाज अधिक सक्षम व परिणामकारकपणे करण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिका स्तरावरील बहुतांश कामकाज आधीपासूनच मराठी भाषेत होत असून, कार्यालयीन व्यवहार, सरकारी दस्तऐवज आणि दैनंदिन कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

मराठी भाषा ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यक अशा विविध ज्ञानशाखांमधील उच्च शिक्षण मराठी माध्यमात उपलब्ध करून देणे, मराठी भाषेला नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, सर्वसामान्यांना समजेल अशी प्रशासकीय मराठी विकसित करणे तसेच बोली भाषांचे जतन व संवर्धन करणे, या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शासनामार्फत विविध शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने महापालिकेच्या विधी समितीने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव केला आहे.

मराठी भाषेतील लेखन, अनुवाद आणि अभिव्यक्ती कौशल्य वाढवण्यासाठी तसेच कार्यालयीन संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मराठी विषयामध्ये उच्च शिक्षण घेतल्यास महापालिकेच्या कामकाजात त्याचा अधिक परिणामकारक उपयोग होणार आहे. तसेच मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार-प्रसार व विकास साधावा, या दृष्टीनेदेखील हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"