सांगवीतील दोन स्पा सेंटर आणि हिंजवडीतील एक लॉजिंग बोर्डिंग पोलीस आयुक्तांच्या आदेशाने बंद!

सन 2025 मध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या आठ आस्थापना बंद
पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी व परिसरात बेकायदेशीर वेश्याव्यवसाय करणारे सांगवीतील दोन स्पा सेंटर आणि हिंजवडीतील एक लॉजिंग बोर्डिंग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. स्पा सेंटर, अतिथी लॉजिंग अँड बोर्डिंग हे धार्मिक व शैक्षणिक अशा सार्वजनिक ठिकाणी असल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत होता. परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी ह्या आस्थापना बंद करण्याचा आदेश दिला आहे

सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील जी. एस. स्पा (फ्लॅट नंबर दोन, दुसरा मजला अथर्व बिल्डिंग, गांगुर्डे नगर, सर्वे नंबर 51) येथे अवैधरीत्या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा यांनी छापा टाकून एक महिला आरोपी व व्यंकटेश कोदंडबानी यांच्या विरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय सांगवी येथील ऑरा थाई स्पा (शॉप नंबर एक, 201 ते 204 दुसरा मजला, रोझ आयकॉन ॲमेनिटी कंडोमिनियम बिल्डिंग, पिंपळे सौदागर) येथे स्पा सेंटरचे नावाखाली वेश्याव्यवसाय चालू होता. येथेही मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखा यांनी छापा टाकून आरोपी अभिजीत लॉरेन्स यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिथी लॉजिंग बोर्डिंग काकडे मळा जवळ, विनोदी वस्ती, हिंजवडी) येथे अवैधरित्या लॉजचे नावाखाली वेश्याव्यवसाय चालू असल्याने सदर ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा यांनी छापा टाकून प्रवीण बळीराम असटकर ,युवराज राजेंद्र पाटील ,राहुल चव्हाण उर्फ अमित यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जी एस स्पा सेंटर ,ऑरा थाई स्पा सेंटर ,अतिथी लॉजिंग अँड बोर्डिंग यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात पिटा कायदा कलम सात लावण्यात आलेले आहे. त्यानुसार पिटा कायदा कलम 18 च्या तरतुदीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी व हिंजवडी यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना या अस्थापना बंद करण्याचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी प्राथमिक चौकशी अंति या आस्थापना बंद करण्याचा आदेश दिला आहे.
सन 2025 मध्ये अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकूण आठ आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत .2023 मध्ये 12, 2024 मध्ये सहा अशा एकूण आज पर्यंत 26 सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या आस्थापना पोलीस आयुक्तांनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 16 स्पा, आठ लॉजेस व दोन रहिवासी फ्लॅट्स यांचा समावेश आहे.

