माहिती अधिकाराबाबत पीएमआरडीएमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याबाबत यशदाच्या प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या सप्तसूत्री कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राधिकरणाच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दि. १२ व १३ मार्च रोजी प्रशिक्षण देण्यात आले. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून कार्यालयाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी व नागरिकांच्या अर्जावर विहित मुदतीत कार्यवाहीकरीता ही प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
माहिती अधिकार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबत यशदाच्या माहिती अधिकार केंद्राचे प्रशिक्षक प्रवीण जिंदम, दादू बूळे, ओमकार पाटील यांनी माहिती अधिकार कायद्याचा थोडक्यात इतिहास, महत्त्व, कलम याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रामुख्याने या प्रशिक्षण शिबीरात माहिती अधिकाराचे अर्ज कसे निकाली काढणे, संबंधितांना माहिती कशी द्यावी, शासनाचे परिपत्रक, निर्णय, आदेश तसेच पत्रव्यवहार कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरादरम्यान अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन प्रशिक्षकांनी केले. यावेळी प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पुनम मेहता, उपजिल्हाधिकारी किरणकुमार काकडे, उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, कक्ष अधिकारी विशाल ताठे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.