एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी !

मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेल द्वारे पाठवण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली. मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात धमकीचा मेल करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसाकडून या मेलचा तपास सुरू आहे.
एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांपासून निनावी फोन आणि धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. तसेच हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागे कोणाचा हात आहे, याची चौकशी सुरु आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे.