एका पेजरमधून निर्माण झालं अस्त्र?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
लेबनॉन : इस्रायल आणि लेबनॉनमधील अतिरेकी संघटना हिजबुल्लाहमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. काल मंगळवारी हिजबुल्लाहच्या अतिरेक्यांकडे आणि काही अधिकाऱ्यांकडे असलेल्या हजारो पेजर्सचे स्फोट झाले. यात ९ जणांचा मृत्यू झाला तर अडीच हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
इस्रायलच्या गुप्तचरांनी या पेजर्समध्ये स्फोटकं लपविली होती, असा आरोप हिजबुल्लाहने केला आहे. तैवानमधील गोल्ड अपोले कंपनीने हे पेजर विकसित केले होते आणि याच कंपनीचे हे उत्पादनही होते. एक संदेश या पेजरवर आला आणि क्षणार्धात हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट झाला. रॉयटर्सने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेने काही महिन्यांपूर्वी तैवानमधील गोल्ड अपोलो कंपनीकडून पाच हजार पेजर्स खरेदी केले होते. मात्र इस्रायलच्या मोसादने ते पेजर्स मॉडिफाय केले. ते करतानाच त्यांनी या पेजर्समध्ये रिमोट ट्रिगर या यंत्रणेसह लहान आकाराची सुसज्ज स्फोटकंही ठेवली. जी, एका संदेशाद्वारे सक्रीय होऊ शकली.
इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने हा हल्ला घडवून आणला की त्यांनी पेजर बनविणाऱ्या कंपनीशी काही संगनमत करून नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हिजबुल्लाहवर हल्ला केला, या बद्दल अजूनही वेगवेगळे दावे केले जात आहेत. इस्रायलच्या या हल्ल्याला जोरदार प्रतिउत्तर देऊ, असं हिजबुल्लाह संघटनेने म्हटले आहे.